बीड: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ट्रेनी शिक्षकांन

बीड: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ट्रेनी शिक्षकांना रोजगाराची हमी देण्यात यावी, या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रेनी शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली.
महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणी योजनेप्रमाणे लाडका भाऊ योजना राबवून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत एका ट्रेनी शिक्षकाची नियुक्ती केली होती. या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळाली. मात्र, प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतरही या युवकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत भविष्यात होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत या सर्व अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकांना प्राधान्य देऊन त्यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान ट्रेनी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत शासनाने आपल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी लावून धरली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नितीन आगम, राजेंद्र आमटे यांच्यासह विकास मगर, दत्ता कातकडे, राहुल शेळके, तांबोळी सना, प्रदीप परमेश्वर, विकास बाबासाहेब, गीते किरण, खटके मीना, स्वाती घोडके, श्यामबाला डाके, गायकवाड आश्विनी, रोहिणी मनमोडे, स्नेहा शिरसाट, शेख रशीद, सिताराम डोके, मोरे संतोष, गवळी ऋषिकेश, बाबर सागर, सटले अशोक, शेलार नितीन, शेख आसमा, वनवे राजेंद्र, नागरगोजे आप्पा आणि केदार चांगदेव आदी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS