यवतमाळ: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात घडलेल्या

यवतमाळ: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न अधोरेखित केला आहे. कर्जमाफीच्या यादीत आपले नाव नसल्याचे समजल्यानंतर मानसिक ताण वाढलेल्या ४९ वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवल्याची घटना भाम गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव राजू बापूराव चुड्डूके (वय ४९) असे असून ते राळेगाव तालुक्यातील भाम येथील रहिवासी होते. शासनाने नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफीची पात्रता यादी पाहण्यासाठी ते स्थानिक बँकेत गेले होते. मात्र, त्या यादीत आपले नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते अत्यंत निराश होऊन घरी परतले. त्यानंतर त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, राजू चुड्डूके यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज होते. त्याशिवाय काही सूक्ष्म वित्त संस्थांकडूनही (Microfinance) त्यांनी कर्ज घेतले होते. शेतातून अपेक्षित उत्पन्न न मिळणे, वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणी यामुळे ते काही काळापासून मोठ्या चिंतेत होते. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याचे समजल्यानंतर त्यांचा मानसिक ताण आणखी वाढला.
राजू चुड्डूके यांच्या मालकीची सुमारे १ हेक्टर ३९ आर शेती असून त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. मात्र, सततच्या आर्थिक संकटामुळे त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली होती. विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.

COMMENTS