मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकरी भाविकांना व्यापक व दर्जात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. “भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत तब्बल ७ लाख ४७ हजार १७८ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली असून, विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली.
वारीदरम्यान पालखी मार्ग आणि पंढरपूर येथील आरोग्य शिबीरांमध्ये ७ लाख ४२ हजार ७३१ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले. ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली, तर १ हजार ६०० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित (Refer) करण्यात आले. वारीदरम्यान संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांवरही प्रभावी उपचार करण्यात आले. यामध्ये ४० हजार ९३३ तापाचे रुग्ण, ११ हजार ४८६ उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ९ हजार ९७३ मधुमेहाचे रुग्ण, २३ हजार १०२ तीव्र श्वसन संसर्ग रुग्ण, १९ हजार ४७७ अतिसार, ५ हजार ४५५ आमंशाचे (Dysentery) रुग्ण, तसेच २१४ रस्ते अपघातग्रस्त, ५१ हृदयविकाराच्या झटका आलेले रुग्ण, ३६५ श्वानदंशाची प्रकरणे आणि १ सर्पदंशाच्या प्रकरणावर तातडीने उपचार करण्यात आले. याशिवाय ३ क्षयरोगाचे (TB) रुग्ण आढळून आले असून इतर ६ लाख २९ हजार ६२९ रुग्णांनाही आवश्यक आरोग्य सेवा देण्यात आली.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ६९ सुसज्ज आयसीयू (ICU), १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर अहोरात्र कार्यरत होते.
याशिवाय यंदा प्रथमच एअर ॲम्बुलन्स (Air Ambulance) सेवा, ‘आरोग्यसंपन्न वारी’ वेब ॲप, पंढरपूरमधील २४ तास आयसीयू सुविधा, महाआरोग्य शिबीर, मोफत चष्मा वाटप, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य जनजागृती आणि डिजिटल मॅपिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाने वारीच्या संपूर्ण कालावधीत वारकरी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध करून देत “भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची” ही संकल्पना यशस्वीपणे साकार केली.

COMMENTS