Homeताज्या बातम्या

हसनापूर परिसरातील पाणंद रस्त्यांचे मुरमीकरण करावे  शिवसेना नेत्या हर्षदा काकडे यांचे तहसीलदारांना निवेदन

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील मौजे हसनापूर येथून विविध गावांना जोडणाऱ्या प्रमुख जुन्या पानंद रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक, शेतकरी आणि

शरणपूर वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन; दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पिठाची गिरणी भेट
योग हा संतुलित जीवनाचा सर्वोत्तम मार्ग; कोपरगावमध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
‘वृद्धेश्वर’ची निवडणूक बिनविरोध की रंगतदार लढत?; राजळे घराण्याच्या वर्चस्वाकडे लक्ष


शेवगाव : शेवगाव तालुक्यातील मौजे हसनापूर येथून विविध गावांना जोडणाऱ्या प्रमुख जुन्या पानंद रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यांची तातडीने पाहणी करून मुरमीकरण व खडीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या तथा शिवसेना नेत्या सौ. हर्षदा काकडे यांनी हसनापूर ग्रामस्थांसमवेत मंगळवारी (दि. २३) शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हसनापूर ते सोनेसांगवी, हसनापूर ते राक्षी, पाण्याची टाकी ते गारुडीबाबा मंदिर रस्ता तसेच हसनापूर शिवरस्ता ते चिमणदरा वस्ती हे गावांना जोडणारे प्रमुख पानंद रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून वापरात आहेत. शेतजमिनींतून जाणारे हे कच्चे व मातीचे रस्ते सध्या मोठमोठ्या खड्ड्यांनी भरले असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने ते निसरडे आणि धोकादायक बनतात. विशेषतः पाण्याची टाकी ते गारुडीबाबा मंदिर या मार्गावर पावसाचे पाणी साचून रस्ताच पाण्याखाली जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेकदा या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याने शेतमाल, जनावरांचा चारा तसेच इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक करताना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेती मशागत, पेरणी, कापणी आणि शेतमालाची ने-आण यासाठी हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
हसनापूर व परिसरातील विविध लोकवस्त्या तसेच इतर गावांना जोडणाऱ्या या रस्त्यांना दळणवळणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित रस्त्यांचे त्वरित मुरमीकरण व खडीकरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर विजय ढाकणे, संजय ढाकणे, एकनाथ ढाकणे, संदीप ढाकणे, नितीश धायगुडे, ज्ञानेश्वर नागरे, रावसाहेब बडे, अंकुश ढाकणे, प्रकाश धायगुडे, अशोक ढाकणे, प्रभाकर धायगुडे, संदीप विघ्ने, विश्वास ढाकणे, रविंद्र ढाकणे, अशोक शिरसाठ, अजिनाथ विघ्ने, रामनाथ खंडागळे यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

COMMENTS