अनिल देशमुखांच्या स्वीय सहायकांना कोठडी ; ईडीसमोर हजर होण्यास नकार; अटकेची टांगती तलवार कायम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या स्वीय सहायकांना कोठडी ; ईडीसमोर हजर होण्यास नकार; अटकेची टांगती तलवार कायम

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सीमा जगासाठी खुल्या (Video)
LOK News 24 । ‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का
उपराष्ट्रपती, कायदामंत्री या पदावरून दूर करा – याचिका दाखल  

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करत असताना देशमुखांचे दोन स्वीय साहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. त्यांना कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, देशमुख यांनी आरोपाची कागदपत्रे सादर होईपर्यंत ईडीसमोर हजर होणार नसल्याचे स्पष्ट केले, तर ईडीने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.  

    बडतर्फ सचिन वाझे याने बार, पब आणि ऑर्केस्ट्रामधून वसूल केलेले कोट्यवधी रुपये अनिल देशमुखांना दिले, असा दावा ईडीचे वकील सुनील गोन्सालवीस यांनी केला आहे. याशिवाय देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमधूनही पैसे उकळले, असाही दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे. ईडीने काही बार मालकांची चौकशी केली असता देशमुखांना चार कोटींचा हप्ता दिल्याची कबुली जबाब दिला आहे. वाझे यानेही असाच जबाब ईडीपुढे दिला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि खासगी स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना कालच (25 जून) ताब्यात घेतले आहे. त्यांनी ईडी अधिकार्‍यांना चौकशीत सहकार्य न केल्याने दोघांना अटक करण्यात आली. देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे हा व्यवहार निश्‍चित करायचा तर दुसरा सहायक कुंदन शिंदे हा पैसे स्वीकारायचा, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. त्यांच्या चौकशीनंतर भरपूर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ईडी पुन्हा देशमुख यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच ईडी देशमुख यांना पुन्हा समन्स पाठवणार आहे. त्यानुसार देशमुख यांना पुढच्या आठवड्यात पुन्हा ईडीच्या चौकशीच्या ससेमीराला सामोरे जावे लागणार आहे.

वसुलीच्या कामचे शिस्तबद्ध विभाजन

वसुलीच्या कामाचे विभाजन हेदेखील शिस्तबद्धपणे करण्यात आले होते. मुंबई पोलिस दलातील जेवढे झोन आहेत, त्यानुसार एक वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती. त्या यंत्रणेमार्फत पैसे गोळा केले जात होते, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली.

’’माझा जबाब काल ईडीने नोंदवून घेतला. माझे वय 72 वर्षे असून मी अनेक सहव्याधींनी ग्रस्त आहे. काल माझी जी चौकशी झाली, त्यामुळे मला खूप थकवा जाणवतो आहे. तसेच, ज्या केसबद्दल माझी चौकशी करण्याचा विचार आहे, तिच्याशी माझा संबंध नसून माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.’’

अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

COMMENTS