Homeताज्या बातम्या

महानगरांच्या धर्तीवर आष्टी-मुर्शदपूरकरांना सुविधा

‘क्विक कनेक्ट’चा शुभारंभ; एका फोनवर गरजेच्या वस्तू घरपोच आष्टी : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत नागरिकांकडे पैसा असला तरी वेळेची मोठी कमतरता ज

पश्चिम आशियातील संकटातून ४,०५२ भारतीय मायदेशी परतले
ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाही; सहा खासदारांच्या विलिनीकरणावर स्थगती देण्यास नकार
येमेनजवळ भारतीय जहाजावर भीषण हल्ला; १३ भारतीयांसह सर्व १४ खलाशी सुरक्षित

‘क्विक कनेक्ट’चा शुभारंभ; एका फोनवर गरजेच्या वस्तू घरपोच

आष्टी : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत नागरिकांकडे पैसा असला तरी वेळेची मोठी कमतरता जाणवते. दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्यात नागरिकांचा बराच वेळ खर्च होतो. हीच अडचण लक्षात घेऊन ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आष्टी शहर व मुर्शदपूर परिसरातील नागरिकांसाठी महानगरांच्या धर्तीवर ‘क्विक कनेक्ट’ ही घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे.

शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी आष्टी शहरातील शनिमंदिर येथे सकाळी 11 वाजता युवानेते जयदत्त धस यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेमुळे नागरिकांना एका फोनवर आपल्या गरजेच्या वस्तू मागविता येणार असून, त्या घरपोच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यावेळी बोलताना जयदत्त धस म्हणाले की, आज प्रत्येक व्यक्ती नोकरी, व्यवसाय, शेती आणि कौटुंबिक जबाबदार्‍यांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्यासाठीही अनेकदा अर्धा दिवस खर्च होतो. नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचवून त्यांच्या गरजेच्या वस्तू घरापर्यंत पोहोचविण्याचे काम ‘क्विक कनेक्ट’च्या माध्यमातून होणार आहे. आष्टीसारख्या शहरात महानगरांच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून, आष्टी व मुर्शदपूर परिसरातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

बदलती जीवनशैली आणि स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ‘क्विक कनेक्ट’ची संकल्पना राबविण्यात आली आहे. ग्राहकांना वारंवार बाजारात जाण्याची गरज भासू नये, तसेच त्यांचा वेळ व श्रम वाचावेत, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः नोकरदार, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक आणि वेळेअभावी बाजारात जाता न येणार्‍या नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या शुभारंभ कार्यक्रमास व्यापारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मेहेर, नवनित कासवा, विजय बोगावत, सुभाष बोंदार्डे, प्रविण कदम, रिजवान शेख, कैलास दरेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सानप, पत्रकार शरद तळेकर, प्रविण पोकळे, रघुनाथ कर्डिले, शरद रेडेकर, मनोज पोकळे, पांडुरंग दळवी, शशिकांत डोमकावळे, चेतन मेहेर, प्रितम बोगावत, अक्षय कासवा, पारस मेहेर, अंकीत जोशी, निखील कटारिया, निखील ढेगे, शिवलाल कटारिया, देवेश जोशी, योगेश कुंभकर्ण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज शिंदे यांनी केले, तर आभार गणेश दळवी यांनी मानले.

वेळ वाचवून घरपोच सेवा ‘क्विक कनेक्ट’मुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी नागरिकांना वारंवार बाजारात जाण्याची गरज कमी होणार आहे. एका फोनवरून आवश्यक वस्तू मागविता येणार असल्याने नागरिकांचा वेळ व श्रम वाचतील. आष्टी शहरात आधुनिक सुविधेच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

  • संजय मेहेर, व्यापारी, आष्टी

COMMENTS