नांदेड : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, अवैध प्रवासी वाहतूक आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर अंकुश ठेवण्यासाठी नांदेड पोलिसांनी

नांदेड : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, अवैध प्रवासी वाहतूक आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर अंकुश ठेवण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेत धडक कारवाई केली. या विशेष मोहिमेत एकाच दिवसात तब्बल 260 प्रकरणे नोंदवून 2 लाख 51 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजीराबाद आणि इतवारा यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. शहरात वाढलेल्या बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः विनापरवाना धावणारी वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, भरधाव वेगाने वाहन चालविणे तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून आवाज करणार्या ‘बुलेट’स्वारांविरोधात तक्रारींचा भडिमार होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला. वजीराबाद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन रोड, वजीराबाद चौक, कलामंदिर, वर्कशॉप, राजकॉर्नर आणि छत्रपती चौक या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. वाहनांच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी करत ट्रिपल सीट दुचाकीस्वार, विनापरवाना वाहनचालक, वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने आणि नियमबाह्य पार्किंग करणार्यांवर कारवाई करण्यात आली. या विभागात एकट्या 249 प्रकरणांमध्ये 2 लाख 42 हजार 650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, इतवारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जगन पवार यांनी बर्फी चौक, देगलूर नाका आणि सिडको परिसरात कारवाई करत 11 प्रकरणे नोंदवून 9 हजार 250 रुपयांचा दंड आकारला. या दोन्ही विभागांच्या संयुक्त कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोहिमेच्या निमित्ताने पोलिसांनी नागरिकांनाही स्पष्ट इशारा दिला आहे. रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करू नये, फळगाड्या किंवा अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच सिग्नलचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, शहरातील वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

COMMENTS