नांदेड : पुणे-नांदेड तसेच हैदराबाद-नांदेड 'वंदे भारत' सेवा तात्काळ सुरू करावी आणि हजूर साहिब नांदेड येथे वंदे भारत व अमृत भारत गाड्यांसाठी रेल्वे

नांदेड : पुणे-नांदेड तसेच हैदराबाद-नांदेड ‘वंदे भारत’ सेवा तात्काळ सुरू करावी आणि हजूर साहिब नांदेड येथे वंदे भारत व अमृत भारत गाड्यांसाठी रेल्वे कोच तसेच मेंटेनन्स देखभाल डेपो उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी मराठवाड्याच्या रेल्वे विकासाचे व्हिजन मांडले.
खा. डॉ. गोपछडे यांनी नांदेड रेल्वे स्थानकावरील पिट लाईन मालटेकडी येथे स्थलांतरित करून मालटेकडी स्थानकाचा सर्व सुविधांसह विकास करावा, तसेच नांदेड इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेडचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली. याशिवाय नांदेड-लातूर रोड आणि नांदेड-बिदर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देणे, तसेच बोधन-बिलोली-नरसी-लातूर रोड (१३४ किमी) या सर्वेक्षण झालेल्या रेल्वेमार्गास मंजुरी देऊन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक आणि नवीन गाड्यांची मागणी: हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचे, आधुनिक व पर्यावरणपूरक स्थानक म्हणून विकास करावा, ज्यात सौर ऊर्जा प्रणाली, मल्टीलेव्हल पार्किंग आणि तख्त हजूर साहिबच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारे वास्तुकला डिझाईन समाविष्ट असावे.
संपर्काच्या दृष्टीने जालना-नांदेड-काचीगुडा-तिरुपती दैनिक पुष्करिणी एक्सप्रेस, नांदेड-सावंतवाडी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस आणि पूर्वोत्तर भारतासाठी नांदेड-धुबरी साहिब-तीनसुकिया ‘अमृत भारत’ रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पूर्णा-पटना एक्सप्रेस त्रिसाप्ताहिक करणे आणि बंगळुरू-नांदेड एक्सप्रेस वाराणसीपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
धर्माबाद स्थानकाच्या नामकरणाची विनंती: धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार रेल्वे स्थानक’ असे करण्याची विनंतीही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. तसेच नांदेड-मुंबई वंदे भारतचा प्रवास कालावधी ८ तासांच्या आत आणण्याची आणि उमरी-धर्माबाद-बासर मार्गावरील रेल्वे अंडरब्रिजचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.

COMMENTS