नेत्यांची विवादास्पद विधाने

Homeसंपादकीय

नेत्यांची विवादास्पद विधाने

गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून अलिप्त राहायचे असेल, तर गर्दी करू नका, असे सांगितले जाते.

न्यायाधीशांच्या नियुक्त्यांचा घोळ
सीएम केअर फंडाचा अभिमानच! पीएम केअर चे काय…?
धर्म व राजकारणाची सरमिसळ

गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून अलिप्त राहायचे असेल, तर गर्दी करू नका, असे सांगितले जाते. याचा अर्थ गर्दी हा कोरोना प्रसाराचे मुख्य कारण आहे, असा होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दो गज दुरीचा मंत्र दिला; परंतु ते आणि गृहमंत्री अमित शाह आता लाखोंच्या प्रचारसभा, मिरवणुका घेत आहेत. शाह यांनी कुंभ मेळा तसेच मुस्लिमांसाठी पवित्र असणार्‍या रमजानच्या महिन्यामध्ये कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

एकीकडे नियमांचे पालन न होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करायची आणि दुसरीकडे निवडणूक आणि कोरोनाचा काहीही संबंध नसल्याचे सांगताना महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालची तुलना करायची. त्यातून आपण चुकीचे संदर्भ देत आहोत आणि निवडणूक प्रचार रॅलीचे समर्थन करताना कोरोना प्रसाराला हातभार लावत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. कोरोना आणि निवडणूक याचा संबंध नाही, असे सांगताना महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? तिथे 60 हजार रुग्ण आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये चार हजार आहेत, असे शाह निदर्शनास आणतात. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास राज्यभर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि सभा, समारंभ कारणीभूत ठरले, हे शाह यांच्या लक्षात आलेले नसावे. गेल्यावर्षी टाळेबंदी लावली, तेव्हा उद्देश वेगळा होता. त्या वेळी कोणतेही औषध किंवा लस नव्हती. आता लस आली असली, तरी कोरोनाचा दुसरा स्टेंट अधिक वेगाने पसरतो आहे. त्याने लहान मुलांनाही विळख्यात घेतले आहे. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड अशा सर्वांची टंचाई आहे. अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी नेत्यांनी आपण जे पूर्वी सांगितले, त्याचे तरी अनुकरण करतो का, हे पाहायला हवे. लोक नेत्यांचे अनुकरण करीत असतात. नेतेच जेव्हा कोरोनाविषयक नियमावली धाब्यावर बसवितात, तेव्हा लोकही तसेच करतात. आसाममचे आरोग्यमंत्री हेमंत विस्वा सरमा हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनीच कोरोना पळून गेला आहे, मुखपट्टी लावण्याची गरज नाही, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. आता त्यांनी चक्क निवडणूक प्रचार रॅली आणि कोरोनाच्या संसर्गाचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. एका संशोधनानुसार ज्या ज्या ठिकाणी प्रचार रॅली झाली होती, तिथे कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. तसेच सर्वच उमेदवारांना कोरोनाची लागणही झाली नाही. त्यामुळे आसाममधील निवडणूक प्रचार रॅली आणि कोरोना संसर्गाचा काहीच संबंध नाही हे सिद्ध होते, असा अजब दावा सरमा यांनी केला आहे. शाह यांच्या विधानाशी साधर्म्य असणारे त्यांचे हे विधान आहे.

शाह ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्याच सरकारमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेला अहवाल मात्र त्यांच्या विधानांना शह देणारा आहे. निवडणूक आणि कोरोना यांचा कसा परस्परांशी संबंध आहे, हे एकदा त्या अहवालातील आकडेवारी पाहिली, की लक्षात येते. आसाममध्ये 27 मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिल रोजी तीन टप्प्यांत मतदान झाले. या वेळी सर्वच राजकीय पक्षांनी चार एप्रिलपर्यंत प्रचार केला होता. राज्यात फेब्रुवारीमध्ये 396 कोरोना रुग्ण सापडले होते. मार्चमध्ये ही संख्या 875 आणि 16 एप्रिलपर्यंत चार हजार 528 वर गेली आहे. सरमा यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलावला असल्याचा दावा केला आहे. गुवाहाटी, दिब्रुगड, जोरहाट, तिनसुकिया आदी शहरांमध्ये, तसेच औद्योगिक ठिकाणी आणि रेल्वे स्थानके आणि विमानतळ असलेल्या भागात कोरोनाची संख्या अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. इतर राज्यांतून येताना लोक कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट घेऊन येत आहेत; मात्र इतर राज्यांतून आणलेले हे कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट स्वीकारले जाणार नाहीत. विमानतळ आणि रेल्वे स्थानकात प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट करावीच लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी कोरोना रोखण्यासाठीचे सर्व नियम खुंटीला टांगल्याचे दिसत आहे. आसामच्या लोकांनी आता तोंडावर मुखपट्टी लावण्याची गरज नाही. जेव्हा तशी गरज वाटेल तेव्हा आम्ही लोकांना सूचना देऊ. लोकांनी मुखपट्टी घालूनच फिरायचे ठरवले, तर मग ब्युटीपार्लर्स कशी चालणार? ब्युटीपार्लस चालायला पाहिजेत, अर्थव्यवस्था सुधारायला हवी, अशी विधाने त्यांनी केली. शाह आणि सरमा काहीही बोलत असले, तरी गेले अनेक दिवस ज्या गोष्टीची भीती होती, तीच खरी ठरताना दिसत आहे. गेल्या 15 दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक ते 14 एप्रिल या कालावधीत आसाममध्ये 532 टक्के, बंगालमध्ये 420 टक्के, तामिळनाडूत 159 टक्के, पुद्दुचेेरीत 165 टक्के, तर केरळमध्ये 103 टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांत निवडणुका असलेल्या चार राज्यांतील तसेच एका केंद्रशासित प्रदेशातील मृत्यूचे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढल्याची माहिती मिळाली आहे. पश्‍चिम बंगालमधील तीन टप्प्यांचे मतदान अद्याप व्हायचे आहे. त्यामुळे येथील आकडा काही दिवसांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या राज्यांतून तसेच पुद्दुचेरीतून येत असलेली कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये सभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय रास्त आहे.

COMMENTS