बीड : एका बाजूला शासन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या योजनांद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाचे घोषवाक्य देत असताना, दुसरीकडे एका उच्चशिक्षित महिला शिक्

बीड : एका बाजूला शासन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या योजनांद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाचे घोषवाक्य देत असताना, दुसरीकडे एका उच्चशिक्षित महिला शिक्षिकेला प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आपल्या कुटुंबासह ‘स्वेच्छेने मृत्यू’ची परवानगी मागण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई येथील फातेमा उर्दू माध्यमिक शाळेतील सहशिक्षिका नाझीया बेगम नुरुल हसन यांनी 23 मार्च 2026 पासून पती व लहान मुलींसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
नाझीया बेगम यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्या 2010 पासून कोहिनूर मागासवर्गीय एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित फातेमा उर्दू माध्यमिक शाळेत गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांना पदावरून दूर करण्यासाठी संस्थेकडून सातत्याने मानसिक छळ केला जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. पगार सुरू करून देण्यासाठी व सेवेसंबंधित कामे मार्गी लावण्यासाठी 4 ते 7 लाख रुपयांची लाच मागण्यात आली., तसेच पगारातून 10 टक्के हिस्सा देण्याची अट घालण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे., उच्च न्यायालय व शालेय लवादाच्या आदेशानंतरही त्यांना कामावर रुजू करून घेण्यात टाळाटाळ केली जात आहे., रुजू केल्यानंतरही पुन्हा मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वारंवार तक्रारी करूनही शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत नाझीया बेगम यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग सुरू ठेवू; अन्यथा आम्हाला कुटुंबासह सन्मानाने मरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे. या आंदोलनाला समाजसेवक जैद कादरी यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका करत, एका महिलेला आपल्या लहान मुलांसह उन्हात बसून उपोषण करावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, असे मत व्यक्त केले.

COMMENTS