लिंबागणेश : बीड तालुकातील बालाघाट पट्ट्यातील लिंबागणेश परिसरात सध्या रानडुकरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुक


लिंबागणेश : बीड तालुकातील बालाघाट पट्ट्यातील लिंबागणेश परिसरात सध्या रानडुकरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसत आहेत. त्यामुळे उभी पिके जमीनदोस्त होत असून खाण्यापेक्षा नासाडीच अधिक होत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकर्यांकडून होत आहे. वीजपुरवठा दिवसा उपलब्ध नसल्याने शेतकर्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यावेळी रानडुकरांचा धोका अधिक वाढत असून शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे म्हणाले, काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका यांसारखे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र आमच्याकडे साधे मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही. त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. डॉ. श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजनेअंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण यांसारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये वाढत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

COMMENTS