कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत बस पास" योजनेअंतर्गत सौ. सोनाबाई नामदेवराव स

कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत बस पास” योजनेअंतर्गत सौ. सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्यामंदिर, कर्जत येथे विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण उत्साहात करण्यात आले.या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक किरण भांगे आणि नवनाथ राऊत प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पठाण , शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.बस पास वितरणानंतर विद्यार्थिनींना सुरक्षित प्रवासाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. किरण भांगे आणि नवनाथ राऊत यांनी बसमध्ये चढताना व उतरताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीचे नियम, बस स्थानकातील सुरक्षितता, शिस्त आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.”बस पूर्णपणे थांबल्यानंतरच चढावे-उतरावे, रांगेचे पालन करावे, प्रवासादरम्यान खिडकीतून बाहेर वाकू नये आणि कोणतीही अडचण निर्माण झाल्यास चालक, वाहक किंवा शिक्षकांना तत्काळ माहिती द्यावी,” अशा महत्त्वाच्या सूचनाही विद्यार्थिनींना देण्यात आल्या.कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापिका पठाण मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी या योजनेमुळे मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले.विद्यार्थिनींच्या सुरक्षित, सुलभ आणि नियमित प्रवासासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम शिक्षणाच्या वाटचालीला बळ देणारा ठरत असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

COMMENTS