Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिक मासाचा पडसाद; महिनाभर थांबणार लग्नसराई, धार्मिकतेकडे वाढणार ओढ

नांदेड : सध्या शहरासह ग्रामीण भागात लग्नसराईची लगबग शिगेला पोहोचली असताना, आता या गडबडीला अचानक विराम लागणार आहे. हिंदू पंचांगानुसार 17 मेपासून ज

विकासनगर सोसायटीतील 25 टक्के भाग ड्रेनेजपासून वंचित; नागरिकांचा तीव्र संताप
परशुराम म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहिलेले तप, ज्ञान आणि धर्मतेज-महामंडलेश्वर सुधीरदास महंत
जुना मोंढा ते नविन पूलदरम्यान अतिक्रमणांवर कारवाई
ज्येष्ठ अधिक मास 2026: 17 मई से मांगलिक कार्यों पर लगेगा प्रतिबंध - The CSR  Journal

नांदेड : सध्या शहरासह ग्रामीण भागात लग्नसराईची लगबग शिगेला पोहोचली असताना, आता या गडबडीला अचानक विराम लागणार आहे. हिंदू पंचांगानुसार 17 मेपासून ज्येष्ठ अधिक मासाला प्रारंभ होत असून 15 जूनपर्यंत विवाहासह सर्व शुभकार्ये थांबणार आहेत. त्यामुळे उरलेल्या काही दिवसांत विवाह उरकण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.
अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या महिन्याचा संबंध भगवान विष्णूंशी जोडला जातो. चांद्र आणि सौर वर्षातील कालगणनेतील तफावत संतुलित करण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. साधारणपणे दर तीन वर्षांनी हा योग येतो. धार्मिक मान्यतेनुसार हा काळ सांसारिक उत्सवांपेक्षा भक्ती, साधना आणि आत्मचिंतनासाठी राखून ठेवला जातो. याच कारणामुळे विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, वास्तुशांती, नामकरण, मुंज यांसारख्या मंगलकार्यांना या काळात विराम दिला जातो. परिणामी, 14 मेपर्यंतचे शेवटचे मुहूर्त पकडण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू आहे. शहरातील मंगल कार्यालये, बँड पथके, केटरर्स, डेकोरेशन व्यावसायिक आणि फोटोग्राफर्स यांच्याकडे सध्या मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी एकाच दिवशी अनेक विवाहसोहळे पार पडत असल्याने व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, वाढत्या उष्णतेकडे दुर्लक्ष करत अनेक कुटुंबे लग्नकार्य उरकण्यास प्राधान्य देत आहेत. तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असतानाही वर्‍हाडी मंडळी आणि पाहुण्यांची लगबग कमी झालेली नाही. ग्रामीण भागात तर गावोगावी सनई-चौघड्यांचे सूर ऐकू येत असून विवाहमंडपांनी उत्सवी वातावरण निर्माण केले आहे. धार्मिक जाणकारांच्या मते, अधिक मास हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून मनःशांती, संयम आणि आध्यात्मिक उन्नतीचा कालखंड मानला जातो. या महिन्यात दानधर्म, जप-तप, व्रत, पारायण आणि नामस्मरण यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक भाविक या काळात तीर्थयात्रा, अन्नदान आणि धार्मिक ग्रंथांच्या वाचनाकडे वळतात. दरम्यान, 16 जूनपासून पुन्हा विवाहमुहूर्त सुरू होणार असले तरी त्याचवेळी मान्सूनचे आगमन आणि शेतीकामांची लगबग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्यातील मुहूर्तांकडे अनेक कुटुंबांचा कल कमी असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मे महिन्यातील विवाहसोहळ्यांची संख्या यंदा विक्रमी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS