नांदेड - नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे, या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
नांदेड – नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे, या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या नाट्यशास्त्र विभागाची घटती प्रवेशसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. नाट्यकलेला करिअर म्हणून पाहणार्या विद्यार्थ्यांसाठी हा विभाग अधिक सक्षम होण्याऐवजी त्याचा विद्यार्थी प्रतिसाद कमी होत असेल, तर विद्यापीठ प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. अंबाजोगाईचे ज्येष्ठ रंगकर्मी कै. केशव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या विभागाला प्रारंभी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, कालांतराने नियमित अध्यापन, तुलनेने अधिक शुल्क, प्राध्यापकांच्या नियुक्त्या व सेवा सातत्याशी संबंधित प्रश्न आणि शैक्षणिक वातावरणाबाबत निर्माण झालेली नाराजी यामुळे प्रवेशसंख्येवर परिणाम झाला का, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. नाट्यशास्त्र हा प्रायोगिक अभ्यासक्रम असल्याने अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, लेखन आणि प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांना महत्त्व असते. मुंबई व पुण्यातील नाट्यविषयक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्यामागे शिक्षणासोबत व्यावसायिक क्षेत्राशी जोडणार्या संधी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे ‘नांदेडच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेऊन विद्यार्थ्याला काय मिळणार?’ या प्रश्नाचे उत्तर विद्यापीठाने शोधणे गरजेचे आहे. हा विभाग मराठवाड्यातील नाट्यप्रतिभेला घडविणारे केंद्र बनविण्यासाठी शैक्षणिक पुनरुज्जीवनाचा कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा रंगकर्मी आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS