श्रीगोंदा : तालुक्यातील पारगाव फाटा येथे असलेला सरकारी दिशादर्शक फलक गेल्या सुमारे एका वर्षापासून वाढदिवसाच्या शुभेच्छांचे अनधिकृत होर्डिंग लावून

श्रीगोंदा : तालुक्यातील पारगाव फाटा येथे असलेला सरकारी दिशादर्शक फलक गेल्या सुमारे एका वर्षापासून वाढदिवसाच्या शुभेच्छांचे अनधिकृत होर्डिंग लावून झाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब रामभाऊ शिंदे यांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन देऊन संबंधित होर्डिंग तात्काळ हटविण्याची तसेच त्यावरील कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नानासाहेब शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पारगाव–श्रीगोंदा मार्गावरील हा दिशादर्शक फलक पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. सध्या हा रस्ता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआयडीसी) यांच्या अखत्यारीत आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, जामखेड व इतर भागातील नागरिकांना योग्य दिशा समजण्यासाठी हा फलक अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून आमदारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा होर्डिंगमुळे संपूर्ण सरकारी दिशादर्शक फलक झाकला गेला आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना मार्ग शोधताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नानासाहेब शिंदे यांनी सांगितले की, हा प्रकार यापूर्वीही आमदारांसह संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांतून आणून देण्यात आला होता. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर तहसीलदारांकडे अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात संबंधित अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटविणे, सरकारी दिशादर्शक फलक नागरिकांसाठी खुला करणे आणि होर्डिंगवर छायाचित्रे छापून सरकारी मालमत्तेचा वापर करणाऱ्या संबंधित कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत आ. पाचपुते, श्रीगोंदा पोलीस निरीक्षक तसेच महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कार्यकारी अभियंत्यांनाही पाठविण्यात आली आहे.

COMMENTS