Homeताज्या बातम्या

हनुमान चौकाचा ठराव नेमका कुठे बारगळला? भाजपच्या सत्तेत हिंदुत्ववादी नगरसेवकांच्याच मागणीला केराची टोपली?

नांदेड - नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हिंदू समाजाच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा सन्मान राखत शहरातील वर्दळीच्या वजीरा

काळे गटाचे बिंग फुटले, आंदोलनाच्या नौटंकीचा डाव उधळला : उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घणाघात
भाजपच्या ताब्यातील महापालिकेत अजब प्रकार! महात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या छतावर बिअर बार सुरू?
कोपरगावात विविध अवैध धंद्यांवर एलसीबीचे छापे; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ आरोपींवर ५ गुन्हे दाखल

नांदेड – नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हिंदू समाजाच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा सन्मान राखत शहरातील वर्दळीच्या वजीराबाद परिसरातील चौकाला ‘हनुमान चौक’ असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, ठरावाला सभागृहाची मंजुरी मिळूनही उसकी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठराव मंजूर झाला, मग त्याचे पुढे काय झाले? तो कोणाच्या टेबलवर धूळ खात पडला आहे? की जाणीवपूर्वक त्याची अंमलबजावणी रोखण्यात आली आहे? असे संतप्त सवाल नागरिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहेत.

भाजपचे नगरसेवक सुमित प्रकाश मुथा यांच्या सूचनेवरून हा नामकरणाचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला नगरसेवक तथा सध्याचे उपमहापौर दीपकसिंह रावत, रूची भारतीया, अमृताबाई बजरंगसिंह ठाकूर, तुलजाराम यादव, प्रभाबाई ईश्वरलाल यादव, कुंजीवाले मनजीतसिंग अमरजीतसिंग आणि नवाब गुरुमीतसिंग बरयामसिंग यांनी अनुमोदन दिले होते. त्यामुळे हा प्रस्ताव कोणत्याही एका व्यक्तीची मागणी नसून सभागृहाच्या माध्यमातून पुढे आलेला विषय असल्याचे स्पष्ट आहे.

भगवान श्री हनुमान हे हिंदू समाजाच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण करण्याचा ठराव झाल्यानंतर प्रशासनाने त्याची आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत नामफलक लावणे अपेक्षित होते. मात्र, ठराव कागदावर मंजूर आणि प्रत्यक्षात मात्र गायब, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेत भाजपची सत्ता असताना भाजपच्या नगरसेवकांनी मांडलेल्या आणि अनुमोदित केलेल्या हिंदुत्वाशी संबंधित ठरावाचीच अंमलबजावणी रखडत असेल, तर सत्ताधार्‍यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हनुमान चौकाच्या नामकरणाला नेमका अडथळा कोणाचा? प्रशासनाने ठरावावर आजपर्यंत कोणती कार्यवाही केली? फाईल कोणत्या विभागात अडकली आहे? नामकरणाची अधिकृत घोषणा कधी होणार? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने स्पष्टपणे जनतेसमोर मांडण्याची मागणी होत आहे. दरम्यान, ठरावाची तातडीने अंमलबजावणी करून चौकाला ‘हनुमान चौक’ असे अधिकृत नाव देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याप्रकरणी टाळाटाळ केल्यास हिंदुत्ववादी नगरसेवक आणि नागरिक आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारतील, असा इशाराही दिला जात आहे.

निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाची ग्वाही आणि सत्तेत आल्यानंतर हिंदुत्ववादी ठरावालाच विलंब-हा दुटप्पीपणा कशासाठी? असा थेट सवाल आता परिसरातील हिंदुत्ववादी मतदारांकडून विचारला जात असून, ‘हनुमान चौक’चा ठराव प्रत्यक्षात कधी उतरतो, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS