नांदेड - जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नांदेड पोलिसांनी मंगळवारी मध्यरा

नांदेड – जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नांदेड पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविले. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली. 11 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता सुरू झालेले हे अभियान 12 ऑगस्टच्या पहाटे 3 वाजेपर्यंत सलग चार तास चालले. जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध तसेच शरीराविरुद्ध घडणार्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या कारवाईत सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे, तडीपार व हद्दपार व्यक्ती, हिस्ट्रीशीटर, वॉन्टेड तसेच फरार आरोपींची विशेष तपासणी करण्यात आली. संशयित व्यक्तींच्या झडतीसोबतच न्यायालयाने जारी केलेल्या विविध वॉरंटचीही बजावणी करण्यात आली. मोहिमेत 55 पोलीस अधिकारी आणि 218 अंमलदार सहभागी झाले. स्थानिक गुन्हे शाखा तसेच आरसीपी पथकातील अधिकारी व जवानांनीही कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 55, 56 आणि 57 अन्वये प्रस्तावित असलेल्या 30 तडीपार आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर बाहेर आलेल्या 33 गुन्हेगारांचीही झाडाझडती घेण्यात आली. मालमत्ता व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये यापूर्वी सहभागी असलेल्या 88 सराईत गुन्हेगारांचीही कसून पडताळणी करण्यात आली. दरम्यान, अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी वजिराबाद, भाग्यनगर, इतवारा आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्म्स ॲक्टनुसार प्रत्येकी एक, असे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले असून चार आरोपींना अटक करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 122 अन्वये वजिराबाद आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत 29 जामीनपात्र वॉरंट, पाच बिगरजामीनपात्र वॉरंट आणि 55 समन्स बजावण्यात पोलिसांना यश आले. अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी वचक निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अशा स्वरूपाच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS