देवळाली प्रवरा : "ज्याचा दफनविधी झाला, तोच काही दिवसांनी जिवंत घरी परतला..." हे वाक्य ऐकायला चित्रपटातील कथानक वाटेल; मात्र राहुरी तालुक्यातील स

देवळाली प्रवरा : “ज्याचा दफनविधी झाला, तोच काही दिवसांनी जिवंत घरी परतला…” हे वाक्य ऐकायला चित्रपटातील कथानक वाटेल; मात्र राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे अशीच एक धक्कादायक आणि तितकीच गूढ घटना घडली आहे. शब्बीर जमादार मन्सूरी या मतिमंद व्यक्तीला मृत समजून कुटुंबीयांनी अंत्यविधी पार पाडले, पण काही दिवसांनी तोच शब्बीर जिवंत अवस्थेत सापडल्याने मृतदेह ओळख प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शब्बीर काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. मानसिक स्थिती सामान्य नसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. दोन दिवस प्रयत्न करूनही तो न सापडल्याने राहुरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, जोर्वे परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहिती आणि बाह्य स्वरूपावरून तो मृतदेह शब्बीरचाच असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. नातेवाईकांना बोलावून ओळख पटविण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पोस्टमार्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि धार्मिक परंपरेनुसार दफनविधीही करण्यात आला.
घरातील सदस्यांनी शब्बीर कायमचा गमावल्याचे दु:ख मनाशी पक्के केले होते. मात्र नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले होते. काही दिवसांनी अहिल्यानगरच्या भागात एका शेतकऱ्याला भुकेलेला आणि भरकटलेला शब्बीर दिसला. त्याने अन्न दिल्यानंतर संवाद साधला असता त्या व्यक्तीने स्वतःचे नाव शब्बीर आणि आपण सोनगावचा असल्याचे सांगितले. संशय आल्याने शेतकऱ्याने त्याचा फोटो काढून व्हॉट्सॲप समूहांवर पाठविला.
हा फोटो सोनगावपर्यंत पोहोचला आणि नातेवाईकांना धक्काच बसला. व्हिडीओ कॉलद्वारे खात्री झाल्यानंतर कुटुंबीय नगर येथे गेले आणि शब्बीरला सुखरूप घरी घेऊन आले.
या घटनेने आनंदासोबतच एक गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. ज्या मृतदेहाला शब्बीर समजून दफन करण्यात आले, तो प्रत्यक्षात कोणाचा होता? ओळख पटविताना नेमकी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली? आणि अशा प्रकारची चूक कशी घडली?
एका बाजूला कुटुंबीयांना “मृत” समजलेला व्यक्ती पुन्हा मिळाल्याचा आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला दफन झालेल्या अज्ञात व्यक्तीची खरी ओळख अजूनही गूढच आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आणि सत्य काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
“व्हॉट्सॲप ठरले जीवनदायी”
शब्बीरची ओळख पटविण्यात कोणतीही अधिकृत यंत्रणा नव्हे, तर एका शेतकऱ्याने व्हॉट्सॲपवर पाठविलेला फोटो निर्णायक ठरला. त्या एका फोटोमुळे मृत समजला गेलेला शब्बीर पुन्हा आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला. मात्र त्याचवेळी दफन झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

COMMENTS