Homeताज्या बातम्या

नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 80 गुन्हे दाखल, 1.27 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी जून महिन्यात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. 1 ते

बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रांचा र्‍हास; पर्यावरणीय संकट अधिक गडद
अवैध वाळू उपसा प्रकरणी गेवराईच्या तहसीलदारांवर कारवाई का नाही?प्रश्न तडीस लावणार-आ.विजयसिंह पंडित
देगलूर-बिलोली मतदारसंघात जनतेचा संताप अनावर! वाळू माफिया, वाढती गुंडगिरी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात


नांदेड : नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी जून महिन्यात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. 1 ते 30 जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत गुटखा व अंमली पदार्थ प्रकरणी एकूण 80 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1 कोटी 27 लाख 79 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 111 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून परिक्षेत्रातील 10 हजार 604 पानपट्ट्यांची तपासणी करण्यात आली.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात आली. गुटखा विक्री, साठा व वाहतुकीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये 67 गुन्हे दाखल करून 1 कोटी 16 लाख 36 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणांत 92 आरोपींना अटक करण्यात आली. तर अंमली पदार्थांविरोधात 13 गुन्हे दाखल करून 11 लाख 43 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 आरोपींवर कारवाई करण्यात आली. जिल्हानिहाय कारवाईत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 20 गुटखा व 7 अंमली पदार्थांचे गुन्हे नोंदविण्यात आले. परभणीत 23 गुटखा व 3 अंमली पदार्थांचे, हिंगोलीत 12 गुटख्याचे, तर लातूरमध्ये 12 गुटखा आणि 3 अंमली पदार्थांचे गुन्हे दाखल करण्यात आले. या मोहिमेद्वारे अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, 1 जुलैपासून परिक्षेत्रात अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून गुटखा, मटका, जुगार, दारू, अंमली पदार्थ, अवैध वाळू उपसा, अवैध वाहतूक आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना गोपनीयरीत्या द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या ’खबर’ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

COMMENTS