Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवटमध्ये दिव्यांग कर्मचार्‍याला नगरसेवकाची मारहाण; काम बंद आंदोलनाचा इशारा!

किनवट : येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात प्रामाणिकपणे सेवा देणार्‍या एका दिव्यांग सफाई कर्मचार्‍याला नगरसेवकाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत

शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर ‘महसूल’ची कारवाईशेवगावात नाराजगी ; अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप
नगरपरिषदेचा ’काविळ’ की दुटप्पी न्याय?;अतिक्रमणांना अभय, मालकी हक्काच्या जागेला मात्र ’नोटीस’चा फास!
सावकाराचा त्रास; शेतकऱ्याची उपाधीक्षकांकडे धाव

किनवट : येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात प्रामाणिकपणे सेवा देणार्‍या एका दिव्यांग सफाई कर्मचार्‍याला नगरसेवकाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, संतप्त कर्मचारी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोषी नगरसेवकाला तात्काळ अटक न झाल्यास पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 18 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास नरसिंग गंगाराम रामनवाड हे दिव्यांग सफाई कर्मचारी पाणीपुरवठा विभागातील पाण्याच्या टाकीवर आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी नगरसेवक अभय नगराळे तिथे आले. पाणी वेळेवर का सोडत नाही? तुझी जहागिरी आहे का? असे म्हणत त्यांनी नरसिंग यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतक्यावरच थांबला नाही, तर नगरसेवकाने दिव्यांग कर्मचार्‍याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एका लोकप्रतिनिधीनेच एका दिव्यांग कर्मचार्‍यावर हात उचलल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर ’प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, किनवट’ अत्यंत आक्रमक झाली आहे. तालुका अध्यक्ष भगवान मारपवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. दिव्यांग कायदा 2016 अंतर्गत गुन्हा दाखल करून नगरसेवक अभय नगराळे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. केवळ दिव्यांग संघटनाच नव्हे, तर ’महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग संघटनेने’ देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ 23 एप्रिल 2026 पर्यंत आरोपीला अटक न झाल्यास सर्व कर्मचारी ’काम बंद’ आंदोलन करतील, असे मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कर्मचार्‍यांनी काम बंद पुकारल्यास शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विद्युत पुरवठा या सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि दोषी नगरसेवकावर कारवाई होते का, याकडे संपूर्ण किनवट तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS