Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सभापती सदिच्छा सोनी यांच्याकडून महिला सशक्तीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तसेच शिक्षण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सभापती सदिच्छा सोनी- पाटील यांनी घेत

नांदेड शहरातील खंडित वीजप्रश्नी महापौरांचा आक्रमक पवित्रा
किनवट आरोग्य विभागात ’लक्ष्मी दर्शन’चा विळखा; ’आशा’ स्वयंसेविकेच्या हक्कावर भ्रष्टाचाराची कुर्‍हाड!
उर्ध्व मानार प्रकल्पातून आजपासून शेवटची पाणीपाळी; आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकर्‍यांना दिलासा

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तसेच शिक्षण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सभापती सदिच्छा सोनी- पाटील यांनी घेतलेल्या ठोस निर्णयामुळे महिला सशक्तीकरणाला प्रत्यक्ष दिशा मिळाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. महिलांच्या नावावर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी स्वतःच जबाबदारी पार पाडावी, निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी व्हावे आणि लोकशाही व्यवस्थेत स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावे, या भूमिकेतून त्यांनी बैठकीत नगरसेविकांच्या प्रतिनिधींना दूर ठेवत नवा आदर्श निर्माण केला आहे.
महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस उपसभापती निरंजना लांडगे, सदस्या अमृता ठाकूर, अश्विनी घोंगडे, सुलोचना काकडे आणि राजश्री गोडबोले या नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी महिला सदस्यांनी विविध विषयांवर थेट मते मांडली, सूचना दिल्या आणि समितीच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यामुळे महिलांना केवळ निवडणुकीपुरते स्थान न देता प्रत्यक्ष प्रशासनात सक्षम भूमिका देण्याचा संदेश या बैठकीतून देण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. सभापती सदिच्छा सोनी-पाटील यांनी स्पष्टपणे नमूद केले की, महिला आता सर्वच क्षेत्रांत समर्थपणे कार्य करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महिला प्रतिनिधींनी स्वतः निर्णय घ्यावेत, विषय समजून घ्यावेत आणि नागरिकांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडावी. महिलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना स्वायत्ततेने काम करू देणे, हाच खर्‍या अर्थाने सशक्तीकरणाचा मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बैठकीत शिक्षण आणि बालकल्याण विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांची दुरुस्ती तातडीने व्हावी, आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच आरोग्य शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि बालसंगोपनविषयक योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशा सूचना सभापतींनी अधिकार्‍यांना दिल्या. या बैठकीस शिक्षणाधिकारी बनसोडे, शहर अभियंता दिलीप टाकळीकर, चंद्रकांत कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महिला सदस्यांनी मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. राजकीय जाणकारांच्या मते, महिलांना केवळ आरक्षण देणे हा प्रारंभ असतो; मात्र त्यांना प्रत्यक्ष अधिकार, नेतृत्व आणि निर्णयक्षमता देणे हेच खरे सशक्तीकरण आहे. नांदेडमध्ये सभापती सदिच्छा सोनी-पाटील यांनी घेतलेला निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करणारा मानला जात आहे. महिलांनी स्वतःच्या बळावर नेतृत्व करावे, प्रशासनाला जाब विचारावा आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्षमपणे उभे राहावे, हा संदेश या निर्णयातून स्पष्टपणे समोर आला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महानगरपालिका व नगरपालिकांनीही या भूमिकेतून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS