Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशासकीय ’कीर्तनात’ भ्रष्टाचाराची ’भैरवी’; आरोग्य विभागाचा 17 हजारांचा ’श्रमपरिहार’ चर्चेत!

किनवट : एप्रिल रोजी ’माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या गोंडस नावाखाली आयोजित केलेली अवैध पत्रकार परिषद सध्या आरोग्याऐवजी ’आर्थिक वाटाघाटींमुळे’ ताल

नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आयुष्यमान आरोग्य शिबिर; 90 कैद्यांची तपासणी
कुंडलवाडी शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; फॉगिंगसाठी नगरसेवकांची मागणी
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १९ कामगारांचा मृत्यू; ६ जखमी

किनवट : एप्रिल रोजी ’माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या गोंडस नावाखाली आयोजित केलेली अवैध पत्रकार परिषद सध्या आरोग्याऐवजी ’आर्थिक वाटाघाटींमुळे’ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. गावाची आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी बोलावलेल्या या शासकीय व्यासपीठाचा वापर तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी स्वतःवरील भ्रष्टाचाराचे डाग धुण्यासाठी चक्क ’वैयक्तिक कीर्तना’सारखा केला, अशी उपरोधिक चर्चा आता जनमानसात रंगू लागली आहे.
आशा स्वयंसेविकांच्या नियुक्तीत झालेल्या कथित घोटाळ्यावर पत्रकारांनी बोट ठेवताच, आरोग्य विभागाच्या बड्या साहेबांची चांगलीच भंबेरी उडाली. नियमावलीवर भाष्य करण्याऐवजी, मी कसा पारदर्शक आहे, याचा पाढा वाचण्यातच साहेबांनी धन्यता मानली. शासकीय कामाचा वेळ आणि पैसा स्वतःची पाठ थोपटून घेण्यात खर्च झाल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्याचे सुतके पसरले होते. या नाट्याचा खरा ’क्लायमॅक्स’ दुसर्‍या दिवशी पाहायला मिळाला. आशा स्वयंसेविकांच्या नियुक्तीचा मुद्दा माध्यमांमध्ये गाजू नये आणि वादावर पडदा पडावा, यासाठी तालुका आरोग्य अधिकार्‍यांकडून कथितरित्या 17 हजार रुपयांचा ’श्रमपरिहार’ वाटप करण्यात आला. जर नियुक्ती प्रक्रिया गंगाजळासारखी पवित्र आणि पारदर्शक होती, तर मग हा चार अंकी रकमांचा ’अर्थपूर्ण’ व्यवहार कशासाठी? असा बोचरा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे, काही सुज्ञ आणि स्वाभिमानी व्यक्तींनी हा ’लाभाचा’ प्रसाद धुडकावून लावत अधिकार्‍यांच्या तोंडाला काळं फासलं आहे. आता हे प्रकरण केवळ चर्चेपुरते मर्यादित राहिलेले नाही. हा 17 हजारांचा आकडा नक्की कुणाकुणापर्यंत पोहोचला? हे ’श्रमपरिहार’ मिशन कोणाच्या माध्यमातून राबवले गेले? याचे सत्य बाहेर येण्यासाठी संबंधित अधिकार्‍याचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (उऊठ) तपासण्याची मागणी जोर धरत आहे. उच्चस्तरीय चौकशी झाल्यास या ’आरोग्य संपन्न’ भ्रष्टाचाराचे अनेक थर उघड होण्याची शक्यता आहे. शासकीय तिजोरीतून की स्वतःच्या खिशातून हा ’श्रमपरिहार’ झाला, याचे उत्तर आता आरोग्य विभागाला द्यावे लागणार आहे. तोपर्यंत तालुक्यात मात्र, साहेबांचं कीर्तन आणि 17 हजारांचं वाटप हाच मुख्य चर्चेचा विषय ठरला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीचे तक्रार आरोग्य विभागातील वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.

COMMENTS