Homeताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली?; पक्षातील ’फितूर’ कोण, कारवाई होणार का?व्हिप असूनही 8 मते कमी; पक्षश्रेष्ठींचा आसूड कधी चालणार, काँग्रेसमध्येच चर्चांना उधाण

नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा मुद्दा आता पक्षांतर्गत चर्चेचा विषय ठरला असून, या प्रकरणात

देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयावरून श्रेयवादाची ठिणगी; खा. डॉ. अजित गोपछडे विरुद्ध आ. जितेश अंतापूरकर आमनेसामने
आ.संजय गायकवाडांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही; शिवसेनेने हात झटकले, विधानाचा केला निषेध
भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच माणूस!



नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा मुद्दा आता पक्षांतर्गत चर्चेचा विषय ठरला असून, या प्रकरणात पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेणार, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षशिस्तीबाबत कठोर भूमिका घेतली असताना, नांदेडमधील या प्रकारावर ते कारवाईचा बडगा उगारतील का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत ऐनवेळी महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार कृष्णा पाटील अष्टीकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. महाविकास आघाडीकडे एकूण 124 नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जात होते. त्यापैकी काँग्रेसकडे तब्बल 92 हक्काची मते होती. पक्षाची मते फुटू नयेत म्हणून काँग्रेसने अधिकृत ’विप’ही जारी केला होता. मात्र, मतमोजणीनंतर कृष्णा पाटील अष्टीकर यांना केवळ 84 मते मिळाल्याने काँग्रेसची किमान आठ मते फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत आदेश धुडकावून काही नगरसेवकांनी इतर उमेदवारांना मतदान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पक्षशिस्तीचा भंग करणार्‍या नगरसेवकांवर काँग्रेस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाल्याने नेमके कोणत्या सदस्यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले, याचा ठोस पुरावा मिळवणे पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या संपूर्ण प्रकारामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पक्षाने विप जारी करूनही अपेक्षित मते उमेदवाराला मिळाली नसल्याने स्थानिक नेतृत्वाच्या समन्वयावर आणि पक्षातील अंतर्गत शिस्तीवरही चर्चा रंगू लागली आहे. एका बाजूला भाजपविरोधी भूमिका घेत असताना, दुसर्‍या बाजूला पक्षातील काही जणांनीच विरोधी बाजूला मदत केली का, असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेची जबाबदारी वरिष्ठ नेतृत्वाकडे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मते फुटल्याची चर्चा होत असल्याने या पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार, याकडेही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची चौकशी होणार की हा विषय कालांतराने मागे पडणार, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. एकूणच, विधान परिषद निवडणुकीतील मतफुटीच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढली असून, पक्षश्रेष्ठी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करतात की संघटनात्मक पातळीवरच या प्रश्नावर पडदा टाकला जातो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

COMMENTS