गेवराई - तालुक्यातील चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. परिसरातील २० ते २

गेवराई – तालुक्यातील चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. परिसरातील २० ते २५ गावांसाठी हे आरोग्य केंद्र महत्त्वाचे असताना येथे कर्मचार्यांची मोठी कमतरता असल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाच्या कागदोपत्री आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठी तफावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व परिचर मिळून अत्यल्प स्टाफ कार्यरत आहे.

कागदावर आरोग्य व्यवस्था, प्रत्यक्षात कर्मचारी टंचाई चकलांबा PHC मध्ये सध्या कार्यरत असलेला स्टाफ:
- वैद्यकीय अधिकारी – २
- आरोग्य अधिकारी/डॉक्टर – १
- LHV (आरोग्य सेविका/भेटीण) – १
- GNM परिचारिका – १
- परिचर – २ (एकूण कार्यरत कर्मचारी – ७)
मोठ्या लोकसंख्येचा आरोग्य भार असताना एवढ्या कमी कर्मचार्यांवर संपूर्ण आरोग्य व्यवस्था चालवावी लागत असल्याने रुग्णसेवेवर प्रचंड परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणार्या रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. सकाळपासून रांगेत उभे राहूनही अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. रात्रीच्या वेळी प्रसूती, अपघात किंवा गंभीर रुग्ण आल्यास २४ तास सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांना गेवराई किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते, यामुळे रुग्णांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
चकलांबा PHC मध्ये पुरेसा स्टाफ नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गुंजाळ आणि ग्रामस्थांनी दिला आहे. चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ आवश्यक कर्मचारी भरती करावी, २४ तास आरोग्य सेवा सुरू करावी, रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा मागण्या ग्रामस्थांकडून करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आता तरी डोळे उघडून चकलांबा PHC ला पुरेसा स्टाफ द्यावा, २५ गावांच्या आरोग्याचा प्रश्न असून याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी जोर धरत आहे.

COMMENTS