नवी दिल्ली : भारतीय आंब्यांच्या नेपाळमधील आयातीवर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्ताला केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने फेटाळून लावल

नवी दिल्ली : भारतीय आंब्यांच्या नेपाळमधील आयातीवर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्ताला केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले असून, भारतीय आंब्याची नेपाळकडे होणारी निर्यात नियमितपणे सुरू असल्याचे सांगितले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सरकारने १० जून २०२६ रोजी आपल्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्थेमार्फत भारतीय आंब्यांच्या आयातीवर कोणतीही बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे. वनस्पती आरोग्याविषयीच्या निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या मालाला आयातीची परवानगी दिली जात आहे. भारत सरकारकडून जारी करण्यात आलेली वैध वनस्पती आरोग्य प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर आयातीला परवानगी तसेच माल सोडण्यास मंजुरी दिली जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
भारतीय आंब्यांच्या निर्यातीची आकडेवारीही मंत्रालयाने जाहीर केली आहे. जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत १४९ खेपांमधून (Shipments) सुमारे २,००५ मेट्रिक टन आंब्याची नेपाळला निर्यात करण्यात आली आहे. एकट्या जून महिन्यात आतापर्यंत १८ खेपांमधून २६६ मेट्रिक टन आंबे नेपाळमध्ये पाठवण्यात आले आहेत. यावरून निर्यात प्रक्रियेत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
नेपाळने अलीकडेच आंबा आयातीसंदर्भातील काही अटींमध्ये बदल केले आहेत. त्यामध्ये नियंत्रित तापमानातील गरम पाण्याद्वारे आंब्यांवर प्रक्रिया करण्याची अट (Hot Water Treatment) समाविष्ट करण्यात आली आहे. भारताने या अटींची पूर्तता करून निर्यात सुरू ठेवली आहे.
तथापि, वनस्पती आरोग्याशी संबंधित नव्या अटी पूर्वसूचना किंवा सल्लामसलत न करता लागू केल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. या विषयावर जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) आरोग्य व वनस्पती आरोग्यविषयक करार तसेच आंतरराष्ट्रीय वनस्पती संरक्षण कराराच्या चौकटीत योग्य द्विपक्षीय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले. कृषी मंत्रालयाने व्यापारी, निर्यातदार आणि सर्वसामान्य नागरिकांना केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS