Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिखलवाडी चौरस्ता ते गुरुद्वारा चौरस्त्याचे काम तातडीने पूर्ण कराआ. बोंढारकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

नांदेड शहराच्या दक्षिण भागातील चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा चौरस्ता या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये तीव

जल जीवन मिशनसाठी केंद्र व राज्यात करार
जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक
कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी



नांदेड शहराच्या दक्षिण भागातील चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा चौरस्ता या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. रस्ता खोदून अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून, स्थानिक रहिवाशांना रोजच प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी संबंधित कामाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने काम पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच ते थांबवण्यात आले असून, गेल्या अनेक महिन्यांपासून कोणतीही प्रगती दिसून येत नाही. परिणामी, रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. धूळ, चिखल आणि असमतल पृष्ठभागामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचार्‍यांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. अपघातांची शक्यता वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. गुत्तेदारांकडून कामात कोणतीही गती दिसत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. बोंढारकर यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी अधिकार्‍यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, दोन दिवसांच्या आत कामाला सुरुवात करून शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्यात यावे. अन्यथा जबाबदारांवर कारवाई करण्यात येईल. त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आ. बोंढारकर यांनी पुढे सांगितले की, शहरातील रस्ते विकासाच्या कामांमध्ये कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून, त्यात कसूर झाल्यास कठोर पावले उचलली जातील. त्यांनी गुत्तेदारांनाही कामात गती आणण्याचे आवाहन केले. या पाहणी दौर्‍यावेळी संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार, सहसंपर्कप्रमुख दर्शनसिंग सिद्धू, उपजिल्हाप्रमुख अवतारसिंग पहरेदार, महानगरप्रमुख दीपक स्वामी, दिलीपसिंग सोढी, अक्षय रावत, रणजीतसिंग गिल, बिरबल यादव, गौतम जैन, सचिन पवार, जोशी, श्याम पाटील वानखेडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नवनाथ सोनटक्के आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

COMMENTS