पंढरपूर: अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलनगरी पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. आषाढी वारीसाठी अजू

पंढरपूर: अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलनगरी पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. आषाढी वारीसाठी अजून दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच आज नवमीला विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून तब्बल आठ किलोमीटर लांब गेली आहे. अजूनही हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन रांगेकडे येत आहेत.
मोठमोठे २० दर्शन मंडप भरूनही आठ किलोमीटरची रांग आताच गेली असून, गेल्या वर्षीपेक्षा तीन पट लांब दर्शन रांग बनवूनही प्रशासनाला अजूनही रांग वाढवण्याची वेळ येत आहे. काल रात्री भाविकांची गर्दी वाढत गेल्यावर पुन्हा तीन किलोमीटरची दर्शन रांग उभारण्यात आली, मात्र त्याच्याही पुढे भाविक रांगेत उभे राहिल्याने आता अजून लांब दर्शन रांग बनवण्याचे काम सुरू आहे. यावर्षी आधी भाविक रांगेत उभे राहतात आणि नंतर पुढे दर्शन रांगेची लांबी वाढवायची वेळ प्रशासनावर येत असल्याने खऱ्या अर्थाने विठ्ठलाची अभूतपूर्व लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे.
१२ लाख बुंदी लाडूंचा प्रसाद तयार
यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. यानिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिर समितीकडून तब्बल १२ लाख बुंदी लाडू बनविण्यात आले आहेत. गरजेनुसार ही संख्या अजून वाढविण्यात येणार असल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, सध्या राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) धडक कारवाई सुरू असताना, मंदिर प्रशासनाने लाडू बनविण्याचे साहित्य आणि तयार केलेले लाडू या दोन्हीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करून घेतली आहे.
वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता केंद्राची उत्तम सोय
पालखी मार्गावर उभारण्यात आलेले विशाल ‘जर्मन हँगर मंडप’ वारकऱ्यांच्या विसाव्याचे प्रमुख केंद्र ठरत आहेत. या केंद्रांमध्ये वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, पायांचे मसाज, शुद्ध पिण्याचे पाणी आणि रात्री भजन-कीर्तनासाठी स्टेजची उत्तम सोय करण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था, स्वतंत्र स्नानगृहे, चेंजिंग रूम आणि हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व सुविधा दुपटीने वाढवण्यात आल्याने दिवसभर प्रवास करून थकलेले वारकरी येथे सुखाने विश्रांती घेऊन पुढील प्रवासासाठी सज्ज होत आहेत.

COMMENTS