Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामकाजात गती, स्वच्छतेत शिस्त; महापौरांचे क्षेत्रीय कार्यालयांना कडक निर्देश

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात गती आणून शहर स्वच्छतेत सुसूत्रता निर्माण करण्यावर भर देण्याचे कडक निर्देश महापौर कविता मुळे य

बदली टाळण्यासाठी ‘दिव्यांग’चा मुखवटा?नांदेड झेडपीत बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट; आरोग्य सहाय्यकाच्या बनावामुळे प्रशासन हादरले
नागरी रुग्णालय अंबाजोगाई येथे बिन टाका शस्त्रक्रिया शिबिरात 35 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
कोट्यवधींचा आरोग्य निधी वाया, खाबूगिरीला लगाम; डॉ. संगीता देशमुख निलंबित



नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात गती आणून शहर स्वच्छतेत सुसूत्रता निर्माण करण्यावर भर देण्याचे कडक निर्देश महापौर कविता मुळे यांनी दिले. दि 15 एप्रिल 2026 रोजी महापौरांच्या दालनात आयोजित बैठकीत सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत शहरातील प्रलंबित नागरी कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत महापौरांनी अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना दिल्या. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. क्षेत्रीय अधिकार्‍यांनी आपल्या-आपल्या विभागातील कामांचा अहवाल सादर करताना विविध अडचणी आणि उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने व्हावे, यावर महापौरांनी विशेष भर दिला. जन्म-मृत्यू दाखले, कर आकारणी व इतर नागरी सेवा मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात फेर्‍या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासनाची सेवा ही नागरिकांपर्यंत सहज आणि जलद पोहोचली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेच्या कामांमध्ये अधिक काटेकोरपणा आणण्याचे आदेश देण्यात आले. कचरा संकलनाची कार्यपद्धती अधिक प्रभावी करून मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, ड्रेनेज लाईनची स्वच्छता, औषध फवारणी आणि आरोग्य विभागाच्या कामांवरही विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले. पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियमित कारवाई करण्याचे आदेशही महापौरांनी दिले. शहरातील शिस्त आणि सुव्यवस्था राखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर म्हणाल्या की, नांदेड शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. क्षेत्रीय कार्यालये हे प्रशासनाचे कणा असून, या स्तरावर कामे वेळेत आणि प्रभावीपणे पार पडल्यास नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल. कामात दिरंगाई करणार्‍या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीस महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग, रमेश चवरे, राजेश जाधव, रावण सोनसळे, गौतम कवडे, निलावती डावरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी, उपअभियंता नरेंद्र सुजलेगावकर आदी अधिकारी उपस्थित होते. महापौरांच्या या निर्देशांमुळे शहरातील प्रशासन अधिक गतिमान होण्यासोबतच स्वच्छता आणि नागरी सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

COMMENTS