Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामनामाचा गजर की सत्तेचा व्यवहार?नांदेडमध्ये सत्ताधार्‍यांची उघडी पडलेली दुहेरी भूमिका

नांदेड : निवडणुकीच्या रणांगणात जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडणारे आणि त्याच घोषणांच्या जोरावर मतांची कापणी करणारे सत्ताधारी, सत्तेच्य

दिल्ली येथील साहित्य संमेलनात डॉ. ज्योती कदम यांच्या कवितेचा गौरव
किनवट न्यायालयात 9 मे रोजी ’लोकअदालत’; पूर्वतयारीसाठी आढावा बैठक
नॅशनल टेक्नीकल स्टुडंट्स असोसिएशन (एनटीएसए) च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी अनिल  धमने

नांदेड : निवडणुकीच्या रणांगणात जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडणारे आणि त्याच घोषणांच्या जोरावर मतांची कापणी करणारे सत्ताधारी, सत्तेच्या गादीवर बसताच रामनामालाच विसरतात, ही बाब आता अपवाद राहिलेली नाही. उलट, हीच एक पद्धतशीर राजकीय प्रवृत्ती बनत चालली आहे. नांदेड महापालिकेच्या अलीकडील कारभारातून या दुटप्पी भूमिकेचे ज्वलंत उदाहरण समोर आले असून, श्रद्धा आणि सत्ता यातील दुरावा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
श्रीराम नवमीच्या निमित्ताने शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. कडक उन्हाची पर्वा न करता लाखो रामभक्त रस्त्यावर उतरले होते. जय श्रीरामच्या घोषणांनी नांदेडचे वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. भक्ती, उत्साह आणि श्रद्धेचा हा महासागर पाहताना शहरात एक धार्मिक उन्मेष निर्माण झाला होता. मात्र, या सगळ्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची उदासीनता ठळकपणे समोर आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याची पूर्ण कल्पना असतानाही महापालिकेने मूलभूत सोयींची योग्य व्यवस्था केली नाही. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर ठरला. कडक उन्हात तासन्तास चालणार्‍या भक्तांना साधे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सत्ताधार्‍यांनी पार पाडली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक ठरली. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून पाण्याची व्यवस्था करत परिस्थिती सावरली; पण ही जबाबदारी प्रशासनाची असताना ती जनतेवरच ढकलली गेली, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या काळात भगवे रुमाल मिरवत, जय श्रीरामचा जयघोष करत मतदारांच्या दारात जाणारे अनेक नगरसेवक या शोभायात्रेत कुठेच दिसले नाहीत. काहींनी केवळ फोटोसेशनसाठी थोडक्यात हजेरी लावली, तर काहींनी पूर्णपणे अनुपस्थित राहणे पसंत केले. रामभक्तांचे प्रतिनिधी असल्याचा दावा करणार्‍यांनी प्रत्यक्ष सेवेतून पाय काढून घेतल्याचे चित्र नागरिकांना खटकले. त्यामुळे घोषणांमध्ये राम, पण कृतीत शून्य अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटू लागली आहे. दरम्यान, शहरातील गाडीपुरा, जुना मोंढा, वजिराबाद, शिवाजीनगर, आयटीआय परिसर आदी भागांत विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला. त्यांनी पिण्याचे पाणी, अन्नदान आणि अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था उभी केली. काही जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारीही पुढे आले. या लोकांनी कोणत्याही राजकीय दिखाव्याशिवाय निस्वार्थ भावनेने सेवा केली. याउलट, महापालिकेतील सत्ताधारी महायुतीचे सुमारे 45 नगरसेवक असताना, मोजक्याच लोकांनी प्रत्यक्ष कामात सहभाग घेतल्याचे वास्तव समोर आले. सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून व्यवस्था सांभाळत होते, तर सत्ताधारी मात्र दूरून तमाशा पाहत असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. धार्मिक भावना आणि जनतेची श्रद्धा यांचा वापर केवळ निवडणुकीपुरता मर्यादित ठेवण्याची ही प्रवृत्ती अधिकच ठळक झाली आहे. रामनामाचा वापर सत्ता मिळवण्यासाठी, पण सेवा करण्यासाठी नाही, असा सूर नागरिकांच्या प्रतिक्रियांतून स्पष्टपणे उमटतो आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धार्मिक घोषणांचा वापर हा केवळ मतांसाठीचा एक साधन म्हणून केला जातो का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रद्धा, विश्वास आणि धार्मिक भावनांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून सत्ता मिळवणार्‍यांनी त्या भावनांप्रती किमान जबाबदारी दाखवणे अपेक्षित असते. मात्र, नांदेडमधील या घटनेने त्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे दिसून आले. राजकीय नेत्यांनी आणि नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे. केवळ घोषणांमध्ये जय श्रीराम म्हणणे आणि प्रत्यक्ष कृतीतून रामभक्तांची सेवा न करणे, ही दुटप्पी भूमिका आता जनतेला मान्य होणार नाही. आगामी काळात नागरिक अधिक सजग होत असून, ते केवळ घोषणांवर विश्वास ठेवणार नाहीत, हे स्पष्ट संकेत या घटनेतून मिळत आहेत. शेवटी, श्रद्धेच्या नावावर सत्ता मिळवणार्‍यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा, पुढील निवडणुकांमध्ये हीच जनता त्यांना उत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही. जय श्रीरामचा नारा देणार्‍यांना जनतेकडूनच ‘रामराम’ मिळण्याची वेळ दूर नाही, असा स्पष्ट इशारा आता नांदेडकर देताना दिसत आहेत.

COMMENTS