Homeताज्या बातम्या

नांदेडच्या राजकारणात “अदृश्य डावपेच” : खा. चव्हाणांना घेरण्याची रणनीती? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतच संशयाचे सावट; अंतर्गत संघर्ष उघड

नांदेड : नांदेडच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला असून, भाजपचे खा

सगरोळी मार्गावरील विस्कळीत बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणीबिलोली-देगलूर व नांदेड-सगरोळी बसफेर्‍या तातडीने सुरू करण्यासाठी नागरिकांचे निवेदन
चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा
विनायक नगर हाउसिंग सोसायटीसाठी पाणीपुरवठा जोडणीची मागणी

नांदेड : नांदेडच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला असून, भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी काही नेत्यांकडून पडद्यामागून डावपेच रचले जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच शिवसेनेचे विधान परिषद आमदार हेमंत पाटील आणि आमदार आनंद बोंढारकर यांच्या हालचालींमुळे महायुतीतच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनवीन राजकीय प्यादे पुढे करून भाजपची मते विभागण्याचा आणि खा. अशोकराव चव्हाण यांचे प्रभावक्षेत्र कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते असून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो,” अशी सार्वजनिक भूमिका आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर घेत असताना, दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर भाजपला खिंडीत पकडण्याच्या हालचाली होत असल्याचा आरोप भाजप समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिशाभूल करून शिवसेनेतील काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत करण्याच्या तयारीत असल्याचीही राजकीय चर्चा रंगली आहे. या संपूर्ण रणनीतीचे अंतिम लक्ष्य खासदार अशोकराव चव्हाण असल्याचे बोलले जात आहे.

जातीय समीकरणे आणि वैयक्तिक गटबाजी ठरणार निर्णायक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभा केल्यास त्याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उलट, उद्धव ठाकरे गटानेही स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवल्यास विरोधकांमध्ये मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नांदेडच्या राजकारणात केवळ पक्षीय समीकरणेच निर्णायक ठरत नाहीत. जातीय समीकरणे, नातेसंबंध, स्थानिक गटबाजी आणि वैयक्तिक राजकीय स्वार्थ यांनाही या निवडणुकीत मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षांमधील लढत न राहता अंतर्गत राजकीय कुरघोडींची परीक्षा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

जुन्या हिशोबांची आणि राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी विधान परिषदेची नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही राजकीय आखाड्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या नेत्यांमधील वट काढण्याची निवडणूक म्हणून पाहिली जात आहे. मागील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून माजी आमदार अमरनाथ राजूरकर रिंगणात असताना भारतीय जनता पक्षाने आमदार चिखलीकर यांचे मेव्हणे श्यामसुंदर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. प्रचंड आर्थिक ताकद आणि जोरदार राजकीय मोर्चेबांधणी करूनही त्यावेळी चिखलीकरांना अपेक्षित यश मिळाले नव्हते.

यानंतर नांदेडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आणि अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ताकद लक्षणीय वाढली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आमदार चिखलीकर आणि आमदार हेमंत पाटील सातत्याने राजकीय रणनीती आखत असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतीलच अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS