परळी वैजनाथ: दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने परमपूज्य श्री आशुतोष महाराजजी यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित श्री गुरुपौर्णिमा महोत्सव वैष्णवी

परळी वैजनाथ: दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने परमपूज्य श्री आशुतोष महाराजजी यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित श्री गुरुपौर्णिमा महोत्सव वैष्णवी मंगल कार्यालय, परळी येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. मराठवाड्यासह विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर गुरुभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सद्गुरु आशुतोष महाराजजी यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरतीने झाली. त्यानंतर झालेल्या सामूहिक भजनाने संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
यावेळी साध्वी सुश्री रुचिका भारतीजी यांनी आध्यात्मिक प्रवचनातून गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. “गुरू-शिष्य परंपरा ही भारताची महान संस्कृती असून श्रद्धा, विश्वास आणि सेवाभावातूनच गुरुकृपा प्राप्त होते. गुरू हा अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ असतो,” असे त्यांनी सांगितले.
स्वामी निरूपानंदजी यांनी मार्गदर्शन करताना, “आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात सद्गुरूच मानवाला योग्य दिशा देऊन आत्मकल्याणाचा मार्ग दाखवतात. गुरूंच्या शिकवणीप्रमाणे प्रामाणिक जीवन जगणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट, सुंदर रांगोळी, प्रकाशयोजना आणि अध्यात्मिक साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले होते. परळी, अंबाजोगाई, लातूर, नांदेड, गंगाखेड, सोनपेठ, माजलगाव, केज, कळंब, सिरसाळा आदी भागांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुकृपेचा आणि दर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या परळी शाखेतील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

COMMENTS