Homeताज्या बातम्या

देवशयनी आषाढी एकादशी: किनवट परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमला; मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी

किनवट: देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर किनवट तालुक्यात भक्तीचा महापूर आला असून, अवघी उपनगरी विठूनामाच्या गजर आणि टाळ-मृदुंगाच्या नादात न्हा

लेंडी प्रकल्पातील सानुग्रह अनुदान ६ महिन्यांपासून रखडले; धरणग्रस्त शेतकर्‍यांची फरफट सुरू
विदर्भात उद्यानविद्या महाविद्यालयाला मंजुरी; पुण्यात एनडीआरएफला कायमस्वरूपी जागा, १७७ तालुक्यांना विशेष निधी
हबीबिया कॉलनीतील ’कल्याण क्लोज’वर पोलिसांचा धडक छापा; १.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांवर गुन्हा

किनवट: देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर किनवट तालुक्यात भक्तीचा महापूर आला असून, अवघी उपनगरी विठूनामाच्या गजर आणि टाळ-मृदुंगाच्या नादात न्हाऊन निघाली. पहाटेच्या मंगल समयी किनवट, बोधडी खुर्द आणि कमठाला येथील विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली होती. श्रीसंत गजानन महाराज मंदिरापासून निघालेल्या विठ्ठलेश्वराच्या नयनरम्य पालखी मिरवणुकीने उपनगरीत एक वेगळाच भक्तीचैतन्य निर्माण केला.

तालुक्यातील कानाकोपर्‍यातील मंदिरे आज आत्मानंदाच्या आणि निस्सीम श्रद्धेच्या प्रवाहात न्हाऊन निघाली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात ठिकठिकाणी भावपूर्ण दिंड्या व पालख्यांच्या नगरप्रदक्षिणा रंगल्या. किनवट येथील श्रीसंत गजानन महाराज मंदिरात दुपारी दिनेश महाराज शास्त्री यांच्या ओघवत्या वाणीतून प्रवचनाचे पुष्प गुंफले गेले. या प्रबोधनाचा व ज्ञानसत्राचा शेकडो भाविकांनी आत्मीयतेने लाभ घेतला.

दिवसभर रंगलेल्या ग्रंथपारायण व भजनांनंतर, रात्रीच्या प्रहरी सुश्राव्य भजनसंध्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा जागर रंगणार आहे. केवळ विठ्ठल मंदिरेच नव्हे, तर तालुक्यातील इतर सर्वच मंदिरे भक्तांच्या गर्दीने आणि धार्मिक उपक्रमांनी गजबजली होती. पेन्दा (नागढव) येथील श्री नागनाथ मंदिर, शनिवारपेठ, मदनापूर आणि भूलजा गावच्या त्रिवेणी संगमावरील (तिनफाटा) सोमेश्वर महादेव मंदिर येथे विविध धार्मिक विधी संपन्न झाले.

तसेच बोधडी बुद्रुक येथील विठ्ठलेश्वर मंदिर, निचपूरचे विठ्ठल-रखुमाई मंदिर, तसेच राजगड व किनवट शहरातील महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. एकंदरीत, अवघा किनवट तालुका आज विठ्ठलमय होऊन भक्तीच्या अथांग सागरात तल्लीन झाला होता.

COMMENTS