संगमनेर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर वृद्ध नागरिकाने केलेला अत्याचार हा महाराष्ट्रासाठी काळीमा फासणारा आहे. अशा घटना पुन्हा

संगमनेर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर वृद्ध नागरिकाने केलेला अत्याचार हा महाराष्ट्रासाठी काळीमा फासणारा आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी अत्यंत कठोर कायदा करणे गरजेचे असून अशा नराधमांना तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात यांनी केली.
संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक व महिलांच्या वतीने संगमनेर बसस्थानक येथे नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी दुर्गा तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा ,शेखर सोसे, नगरसेवक किशोर टोकसे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत महिलांवर अन्याय होतो आहे. विकसित भारत प्रगतशील भारत अशी घोषणा दिली जाते मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहे. गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या लहान मुलीचा काय दोष होता ? असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे, याबरोबर यापुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजे अशी मागणी केली.
डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की, एक आई म्हणून, एक स्री म्हणून मुलींची काळजी वाटत आहे. सरकारने वेळ न दवडता तातडीने अत्यंत कठोर कारवाई करावी. त्याचप्रमाणे यापुढील काळात महिलांची काळजी घेणारे कायदे निर्माण करावी अशी मागणी केली.यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS