कोपरगाव : नगरपरिषदेकडून कोपरगाव शहरातील नागरिकांकडून वाढीव दराने घरपट्टी आकारण्यात येत असून त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. व

कोपरगाव : नगरपरिषदेकडून कोपरगाव शहरातील नागरिकांकडून वाढीव दराने घरपट्टी आकारण्यात येत असून त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. वाढती महागाई आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर ही करवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असल्याने वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच मालमत्ता कर आकारण्यात यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार काळे यांनी गुरुवारी (दि. १५) मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. निवेदनात मालमत्तांचे चुकीचे वर्गीकरण, कर निर्धारणातील त्रुटी, आकारणीतील विसंगती तसेच नागरिकांना पुरेशी माहिती न देता करण्यात आलेली करवाढ याबाबत अनेक हरकती आणि तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थिती, मंदावलेली बाजारपेठ, वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वाढीव घरपट्टीची आकारणी केल्यास सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक बोजा आणखी वाढणार असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांकडून या करवाढीविरोधात मोठ्या प्रमाणावर हरकती आणि तक्रारी दाखल झाल्या असून जनतेतील असंतोषही दिवसेंदिवस वाढत आहे.
असंख्य नागरिकांनी या अन्यायी करवाढी विरोधात नोंदविलेल्या हरकती, तक्रारी व जनतेमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला रोष पाहता ही करवाढ कोपरगावचे नागरिक सहन करू शकत नाही. त्यामुळे सदर वाढीव करवाढीचा पुनर्विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वाढीव घरपट्टीचा तातडीने फेरविचार करून ती पूर्णपणे रद्द करावी आणि पूर्वीच्या कर आकारणी पद्धतीनुसारच मालमत्ता कर आकारण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान या विषयाकडे गांभीर्याने पाहून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

COMMENTS