देवळाली प्रवरा : कवडे मळा परिसरात घडलेल्या लक्ष्मण मार्तंड काळे यांच्या खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत उलगडा करत चार आरोपीं

देवळाली प्रवरा : कवडे मळा परिसरात घडलेल्या लक्ष्मण मार्तंड काळे यांच्या खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत उलगडा करत चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवळाली प्रवरा येथील युवकाचाही समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी रात्री 11 ते 16 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान जाधव मळा, कवडे मळा रोड परिसरात अज्ञात व्यक्तींनी लक्ष्मण मार्तंड काळे (रा. काळेगाव अमरापूर, ता. शेवगाव) यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. तसेच फिर्यादी महिलेवरही प्राणघातक हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, देहेरे गावातील खंडोबाच्या मळा परिसरातून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपींमध्ये लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ (वय 19, रा. विळद घाट, ता. जि. अहिल्यानगर), करण विशाल शिंदे (वय 18, रा. गवळीवाडा, विळद, पाण्याच्या टाकीमागे, ता. जि. अहिल्यानगर), गणेश उर्फ गणीबाबा मनोज चावरे (वय 22, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि विशाल उर्फ रानटी रामचंद्र उमाप (वय 18, रा. विळद घाट, डोके पेट्रोल पंपाजवळ, ता. जि. अहिल्यानगर, मूळ रा. इंद्रानगर, एम.एम. शाळेमागे, पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान मुख्य आरोपी लक्की वैराळ याने जमिनीच्या वादातून हा खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून एक मोबाईल फोन व सिमकार्ड असा एकूण 20 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरिष भोये, पोलीस अंमलदार शाहिद शेख, सुनील पवार, अरविंद भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, भाऊसाहेब काळे, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, सोनल भागवत, चिमा काळे, चालक भगवान धुळे, अरुण मोरे आदींच्या पथकाने केली.

COMMENTS