शिर्डी : भविष्यातील वाढते जलसंकट लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे ही

शिर्डी : भविष्यातील वाढते जलसंकट लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोणी (हसनापूर) येथे नवनिर्मित आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासह जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त स्वप्निल साबळे, प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, कार्यकारी अभियंता बाळासाहेब ननवरे, उपअभियंते मयूर मुनोत व सचिन वंजारी, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगरे आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, राज्यातील तिसरे डिजिटल ग्रंथालय उपकेंद्र लोणी-हसनापूर परिसरासाठी महत्त्वाचे ठरणार असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होईल. जिल्हा नियोजन मंडळातून पाच कोटी रुपयांच्या निधीतून ही इमारत उभारण्यात आली असून येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सध्या अपुऱ्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन सप्टेंबरपर्यंत करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जलपुनर्वापर आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था प्रत्येक शासकीय इमारतीत उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वसतिगृहांमध्ये पाण्याचा अपव्यय, नळांची तोडफोड किंवा इतर शासकीय मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. ही मालमत्ता शासनाची नसून जनतेच्या पैशातून उभारलेली असल्याने ती जनतेचीच संपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाने संयुक्तपणे पाचशे विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे सभागृह उभारावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा उभारण्याचे निर्देशही दिले. आदिवासी समाजातील मुली शिक्षणात उल्लेखनीय प्रगती करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
अहिल्यानगर येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची स्वतंत्र इमारत अंतिम टप्प्यात असून ती जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेली सुमारे ४८० ग्रंथालये कार्यरत असून वाचन चळवळ सक्षमपणे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात देवकन्या बोकडे यांनी आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेशक्षमता ७५ वरून १५० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती दिली. नव्या इमारतीत प्रत्येक मजल्यावर अभ्यासिका व विद्यार्थ्यांच्या निवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनीही मनोगत व्यक्त केले

COMMENTS