दि. 28 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यातील कुपटी-मोहपूर मार्गावरील दिघडी तांडा परिसरातील कच्च्या नळकांडी पुलालगतचा भराव

दि. 28 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यातील कुपटी-मोहपूर मार्गावरील दिघडी तांडा परिसरातील कच्च्या नळकांडी पुलालगतचा भराव वाहून गेला. त्यामुळे पुलाला भगदाड पडून या मार्गावरील बससेवा पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे मंजूर केली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने अद्यापही प्रभावी दुरुस्तीचे काम केले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, किरकोळ वाहनांचीही वाहतूक धोकादायक बनली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी केवळ मातीमिश्रित मुरूम टाकून तसेच रस्त्यालगतची झुडपे जेसीबीने हटवून दुरुस्तीचे केवळ दिखाऊ काम करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही बिकट झाली असून नागरिकांच्या समस्या कायम आहेत. सध्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुपटी-मोहपूर-किनवट हा मार्ग परिसरातील सुमारे 20 ते 25 गावांना तालुका व जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या रस्त्यावर बससेवा बंद झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नागरिकांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विभागाकडून ठेकेदारावर जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी आणि हलगर्जीपणा करणार्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच कुपटी-मोहपूर रस्ता आणि पुलाची तातडीने दुरुस्ती करून बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.

COMMENTS