पुणे: पुण्यातील घोरपडी पेठ भागात दिवसाढवळ्या गोळीबाराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुजल सुनील परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी ख्वाजा उद्दीन नाज

पुणे: पुण्यातील घोरपडी पेठ भागात दिवसाढवळ्या गोळीबाराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुजल सुनील परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूर शेख नावाच्या तरुणावर थेट गोळीबार केला. विशेष म्हणजे हा गोळीबार पोलीस चौकीजवळच घडल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडी पेठ परिसरात दुचाकीवरून आलेल्या सुजल परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी नूर शेख याला गाठून त्याच्यावर थेट गोळी झाडली. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच घबराट पसरली आणि नागरिकांची धावपळ उडाली. या घटनेत पाठीत गोळी लागल्याने नूर शेख रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी नूर शेख याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पळून जाणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर सुजल परदेशी आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य संशयित आरोपी सुजल सुनील परदेशी याला पाठलाग करून तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी दुसऱ्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला की यामागे काही अन्य कारण आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS