७० हजारांची लाच घेताना कर्मचारी रंगेहात अटक पुणे : पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालय

७० हजारांची लाच घेताना कर्मचारी रंगेहात अटक
पुणे : पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात मोठी कारवाई केली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालिकेच्या एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.
उमेश अरुण लोंढे (वय २८, रा. रहाटणी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराने पिंपळे गुरव परिसरात तीन मजली इमारत उभारली होती. या बांधकामास आवश्यक परवानगी नसल्याने महानगरपालिकेने फेब्रुवारी २०२६ मध्ये नोटीस बजावली होती. त्यानंतर संबंधित नागरिकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने नियमानुसार दंड भरून बांधकाम नियमित करण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नियमितीकरणासाठी अर्जही करण्यात आला होता.
मात्र, अतिक्रमण विरोधी विभागाशी संबंधित कर्मचारी उमेश लोंढे याने बांधकामावरील तोडक कारवाई टाळण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. विभागाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे प्राथमिक स्वरूपात स्पष्ट झाल्यानंतर प्रभाग कार्यालयाच्या वाहनतळ (पार्किंग) परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS