नवी दिल्ली : भारतासोबतच्या सीमावादात नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. ऐतिहासिक 'सुगौली करारा'चा हवाला
नवी दिल्ली : भारतासोबतच्या सीमावादात नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. ऐतिहासिक ‘सुगौली करारा’चा हवाला देत बालेन शाह यांनी ब्रिटनकडे मध्यस्थीची आणि मदतीची मागणी केली होती; मात्र ब्रिटनने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील हा मुद्दा पूर्णपणे द्विपक्षीय असून ब्रिटन त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे युके (UK) प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘द काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार, बालेन शाह यांनी अलीकडेच काठमांडूमध्ये ब्रिटिश राजदूत रॉब फेन यांची भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यांजंकर यांनी युक्तिवाद केला की, १८१६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांच्यात झालेल्या सुगौली करारात ब्रिटन मुख्य पक्षकार होता. त्यामुळे या सीमावादात ब्रिटनने पुढाकार घ्यावा. मात्र, ब्रिटिश राजदूत फेन यांनी हा दोन्ही देशांमधील अंतर्गत विषय असल्याचे सांगत हस्तक्षेप करण्यास साफ नकार दिला. नेपाळचा दावा आहे की, या करारामुळे कालापानीसह काठमांडूची काही जमीन भारताकडे गेली आहे.
दुसरीकडे, नेपाळच्या संसदेत बोलताना पंतप्रधान बालेन शाह यांनी, “मी पंतप्रधान झाल्यावर मला कळले की नेपाळने भारताची काही जमीन बळकावली आहे,” असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानावरून नेपाळच्या राजकारणात तीव्र संताप व्यक्त होत असून विरोधी कम्युनिस्ट पक्षाने याला देशद्रोह म्हटले आहे, तर परराष्ट्र मंत्रालयाने हे विधान खोटे असल्याचे सांगत हात झटकले आहेत. सध्या विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची व माफीची मागणी लावून धरली आहे.

COMMENTS