अर्धापूर : ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आधार देणार्या अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातच जर किरकोळ उपचारांसाठीही रुग्णांना थेट दुसर्य

अर्धापूर : ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आधार देणार्या अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातच जर किरकोळ उपचारांसाठीही रुग्णांना थेट दुसर्या रुग्णालयाचा रस्ता दाखवला जात असेल, तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गरजच काय? असा संतप्त सवाल उपस्थित करत आमदार श्रीजया चव्हाण यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रुग्णांवर उपचार करण्याऐवजी सरसकट ‘रेफर’ करण्याच्या तक्रारी, वैद्यकीय कर्मचार्यांच्या कामकाजाबाबतचे आक्षेप आणि एका महिला डॉक्टरच्या अनुपस्थितीत तिच्या पतीकडून रुग्णांवर उपचार केल्याचा प्रकार यामुळे रुग्णालयाचा कारभार चर्चेत आला आहे.
अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात येणार्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तसेच किरकोळ स्वरूपाच्या आजारांमध्येही त्यांना इतरत्र पाठविले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदारांनी रुग्णालय प्रशासनाशी थेट संपर्क साधत संबंधित अधिकार्यांना जाब विचारला. ‘रुग्णसेवेची शपथ घेतली आहे, ती विसरू नका!’ अशा शब्दांत आमदार चव्हाण यांनी वैद्यकीय कर्मचार्यांना सुनावले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी सरकारी रुग्णालयात येतात. अशा वेळी त्यांना आवश्यक उपचार न देता केवळ दुसर्या रुग्णालयात पाठविणे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
रुग्णांना वारंवार इतरत्र पाठविल्यामुळे 108 रुग्णवाहिकांवरही त्याचा परिणाम होत असल्याचा मुद्दा गंभीर ठरला आहे. किरकोळ उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रेफर केल्याने रुग्णवाहिका दुसर्या रुग्णालयात जाण्यात व्यस्त राहते आणि त्याच काळात अपघातस्थळी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अपघातग्रस्तांची गैरसोय होण्याचे प्रकार घडल्याचे तक्रारींतून समोर आले आहे. एका रुग्णाला रेफर करण्याचा निर्णय केवळ कागदावरील नोंद नसून त्याचा थेट परिणाम आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेवर होतो, त्यामुळे रेफर करण्याच्या प्रक्रियेचे काटेकोर परीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वैद्यकीय क्षेत्र हे केवळ नोकरीचे क्षेत्र नाही, तर मानवतेची सेवा करण्याचे व्रत आहे. डॉक्टरांनी रुग्णसेवेची शपथ लक्षात ठेवावी. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळालेच पाहिजेत. माझ्या मतदारसंघातील नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित ठेवणे अथवा त्यांची गैरसोय करणे कदापि सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. श्रीजया चव्हाण यांनी दिला.
दरम्यान, रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या जागेवर तिचे पती रुग्णांवर उपचार करत असल्याच्या तक्रारीचीही प्रशासनाने दखल घेतली आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, त्यामागे कोणाची परवानगी होती आणि संबंधित वैद्यकीय जबाबदारी कोणाची होती, याची चौकशी होणे आवश्यक आहे. यापूर्वीही यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संबंधित कर्मचार्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. आता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून संबंधित कर्मचार्यांना अधिकृत नोटीस बजावण्यात येत आहे. चौकशी पूर्ण करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. दोषी आढळणार्यांवर पुढील कडक कारवाई केली जाईल, असे ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विद्या झिने यांनी स्पष्ट केले. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला उपचार मिळणार की ‘रेफर’ची चिठ्ठी, हा प्रश्न आता अर्धापूरच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभा ठाकला आहे. आमदारांच्या संतप्त भूमिकेनंतर प्रशासनाच्या चौकशीतून नेमके काय बाहेर येते आणि रुग्णसेवेत प्रत्यक्ष सुधारणा होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS