तामसा: येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गंगाप्रसाद नामेवाड यांचे मागील महिन्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने नामेवाड कुटुंबावर दुः
तामसा: येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गंगाप्रसाद नामेवाड यांचे मागील महिन्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने नामेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली होती.
भूमिहीन असलेले गंगाप्रसाद नामेवाड हे पानपट्टीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि चिमुकला मुलगा रुद्र असा परिवार असून, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक व सामाजिक संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी नामेवाड कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांना धीर देतानाच शासनाच्या विविध विमा व अपघाती मदत योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.
दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबाला तात्काळ आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष ड. किशोर देशमुख यांच्या हस्ते २५ हजार रुपयांची आर्थिक मदत नामेवाड कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर, तालुका सरचिटणीस अवधूत कदम, चंद्रशेखर कदम, तालुका उपाध्यक्ष शशिकांत बंडावर, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा ममता जोशी, डॉ. दीपक नाईक, डॉ. संदीप कारंजकर, देवानंद वानखेडे, शिवराज वारकड यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पक्षाच्या वतीने नामेवाड कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भविष्यातही आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पदाधिकार्यांनी दिली. या मदतीमुळे दुःखात सापडलेल्या नामेवाड कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

COMMENTS