Homeताज्या बातम्या

पिंपळगाव फाट्यावर मटका व जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा; १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मांडवी: मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवत पिंपळगाव फाटा येथे मटका व जुगार अड्ड्यांवर दोन स्

संत गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा; गुणवंतांचा होणार गौरव
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे ५ जणांचा मृत्यू; आसाममध्ये पुराचा हाहाकार, बळींचा आकडा ६१ वर
बीड एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती
LCB Raid on Matka Base; Eight people were detained |marathi news

मांडवी: मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवत पिंपळगाव फाटा येथे मटका व जुगार अड्ड्यांवर दोन स्वतंत्र धाडसत्रे राबविली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १ लाख २९ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील पिंपळगाव फाटा परिसरात अनेक दिवसांपासून मटका व जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती मांडवी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत दोन दिवसांत दोन धाड टाकल्या.

पहिल्या कारवाईत २२ जुलै रोजी दुपारी पिंपळगाव फाटा चौकात एक व्यक्ती मोबाईलवरून मटक्याचे आकडे स्वीकारत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अमेश माणिक मडावी (रा. पळशी) याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप तपासणीत मटक्याचे आकडे आढळून आले. त्याच्याकडून मोबाईलसह १० हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर २४ जुलै रोजी सायंकाळी पिंपळगाव फाटा शिवारातील दत्तात्रय मंदिरासमोरील टेकडीवर लिंबाच्या झाडाखाली काही जण ’अंदर-बाहर’ हा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून ब्रम्हम रामृलु सट्टाजीवार, रोहन शंकर बेलसरवा, अबरारखान सतारखान पठाण, दयापाल राजू पाटील, अशोक भिकाजी शेंडे, भूराजी हरी चव्हाण आणि रामकुमार आडेलू पांडेलवार या सात जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा ९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी जुगार अड्डा चालविणारे देविदास राठोड व किरण नरवाडे यांच्यासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मांडवी परिसरातील मटका व जुगार अड्डे चालविणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांविरोधातील अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

COMMENTS