नांदेड: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नांदेड विभागाने 'ऑपरेशन अमानत' आणि 'ऑपरेश

नांदेड: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नांदेड विभागाने ‘ऑपरेशन अमानत’ आणि ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ या मोहिमांअंतर्गत पुन्हा एकदा सतर्कता दाखवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हरवलेला मोबाईल त्याच्या मालकाला परत मिळवून देण्याबरोबरच प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारण्याच्या तयारीत असलेल्या संशयित चोरट्यालाही ताब्यात घेण्यात आले.
दि. २३ जुलै रोजी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कर्तव्यावर असलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल उगेंद्र मीणा यांना एक बेवारस व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन आढळून आला. परिसरात चौकशी करूनही संबंधित मालकाचा शोध न लागल्याने मोबाईल आरपीएफ पोस्ट नांदेड येथे सुरक्षित ठेवण्यात आला. यानंतर त्याच दिवशी नांदेड येथील सचिन (वय ३७) यांनी आरपीएफ पोस्टवर येऊन नातेवाईकांना रेल्वे स्थानकावर सोडल्यानंतर आपला मोबाईल हरवल्याची माहिती दिली. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सुमारे २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल त्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी आरपीएफचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत सीआयबी/डी अँड आय, आरपीएफ नांदेड आणि एलसीबी, जीआरपी छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त पथकाने २४ जुलै रोजी पहाटे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम राबविली. गाडी क्रमांक ११००१ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्लारशाह नांदेडग्राम एक्सप्रेस स्थानकावर थांबलेली असताना प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या तयारीत असलेला अब्दुल मोहसीन (रा. छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले.
संशयिताला पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी), छत्रपती संभाजीनगर यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११२ व ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईनंतर आरपीएफ नांदेड विभागाने रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS