अकोले : भारतीय मजदूर संघ, जिल्हा अहिल्यादेवी नगर यांच्या वतीने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यादेवी नगर येथे जिल्हास्तरीय धरणे आ

अकोले : भारतीय मजदूर संघ, जिल्हा अहिल्यादेवी नगर यांच्या वतीने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यादेवी नगर येथे जिल्हास्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन देशव्यापी स्वरूपात करण्यात येणार असून, या वेळी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरण मिलगीर हे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे संगमनेर विभागीय सचिव अमोल आभाळे यांनी केले आहे.
केंद्र सरकारकडे कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाद्वारे ईएसआयसी वेतन मर्यादा २१ हजारांवरून ४२ हजार करणे, ईपीएफअंतर्गत किमान पेन्शन ९ हजारावरून ९,५०० प्रतिमहिना करणे, ईपीएफ वेतन मर्यादा १५ हजारावरून ३० हजार करणे आदी मागण्या करण्यात येणार आहेत.
तसेच बोनस गणनेसाठी वेतन मर्यादा ६ हजारांवरून ३० हजार, बोनस पात्रतेची वेतन मर्यादा २१ हजारांवरून ४२ हजार करण्याची मागणी करण्यात आली आहे. विविध योजनांमध्ये कार्यरत कामगारांचे मानधन भरघोस प्रमाणात वाढवावे, अशीही मागणी आहे.
कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना ‘समान काम–समान वेतन’ या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करावी, श्रमसंहितांमधील कामगारविरोधी तरतुदी रद्द अथवा आवश्यक सुधारणा कराव्यात, बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील पाच दिवसांचा कामकाजाचा नियम तातडीने लागू करावा, अशा मागण्याही आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुजित उदरभरे, सचिव कृष्णा साठे, कंत्राटी कामगार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन पाटील, राज्य शासकीय कर्मचारी महासंघाचे सुनील मुंगसे, महाराष्ट्र वीज कामगार संघांचे जिल्हा सचिव गणेश कुंभारे यांनी केले आहे.

COMMENTS