राहाता : नगर–मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, ठिकठिकाणी असलेले खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे स्थान

राहाता : नगर–मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, ठिकठिकाणी असलेले खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी तसेच शिर्डीकडे येणारे साईभक्त दररोज त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची मागणी काँग्रेस नेत्या प्रभावती जनार्दन घोगरे यांनी केली आहे.
महामार्गावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने धुळीचे लोट उठत आहेत. महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये धूळ जात असून, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नियमित पाणी फवारणी करून धुळीवर नियंत्रण ठेवणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल घोगरे यांनी उपस्थित केला. या धुळीचा परिणाम महामार्गालगतच्या शेतीपिकांवरही होत आहे. पिकांच्या पानांवर धुळीचा थर साचत असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांसोबतच शेतकऱ्यांनाही या परिस्थितीचा फटका बसत असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिर्डी हे देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारो भाविक या मार्गाने शिर्डीत येतात. साईभक्तांचे स्वागत धुळीचे लोट, खड्डे आणि धोकादायक प्रवासाने होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शिर्डीच्या प्रमुख प्रवेशमार्गाची अशी अवस्था असणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे घोगरे यांनी म्हटले.
महामार्गाचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, खड्डे बुजवावेत, नियमित पाणी फवारणी करावी, वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि शेतीपिकांचे होणारे नुकसान थांबवावे. नागरिक व साईभक्तांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रभावती घोगरे यांनी दिला.

COMMENTS