श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील इंदिरा गांधी विद्या निकेतन शाळेसमोर शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलांकडून भरधाव वेगाने मोटारसायकली चालविणे

श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील इंदिरा गांधी विद्या निकेतन शाळेसमोर शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलांकडून भरधाव वेगाने मोटारसायकली चालविणे आणि रेसिंगसदृश प्रकार होत असल्याची गंभीर तक्रार पालक व ग्रामस्थांनी केली आहे. विशेषतः सायंकाळी साडेचार वाजता शाळा सुटताच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी रस्त्यावर असताना काही अल्पवयीन मुले वेगाने मोटारसायकली चालवत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, शाळा सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याच काळात काही अल्पवयीन मुले मोटारसायकलींवर भरधाव वेगाने फिरताना तसेच रेसिंग करताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अल्पवयीन मुलांच्या हातात मोटारसायकली देणे ही चिंतेची बाब असून वाहन चालविण्याचा वैध परवाना नसताना सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालविणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे. अशा प्रकारामुळे संबंधित मुलांसह इतर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.
पालकांनी शाळा परिसरात शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियमित गस्त ठेवावी, प्रवेशद्वाराजवळ वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी तसेच भरधाव वाहनचालक आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शाळेच्या परिसरात वेगमर्यादा दर्शविणारे फलक, आवश्यक तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, भविष्यात कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वीच संबंधित प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
केवळ दंडात्मक कारवाईने प्रश्न सुटणार नाही
ग्रामस्थांनी सांगितले की, केवळ दंडात्मक कारवाई करून हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये यासाठी पालकांमध्ये जनजागृती होणेही तितकेच आवश्यक आहे. शाळा प्रशासन, पालक, ग्रामस्थ आणि पोलिस यांनी समन्वयाने काम करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

COMMENTS