Homeताज्या बातम्या

प्रसाद साखर कारखान्यातील चोरीचा छडा; तीन आरोपी ताब्यात, संपूर्ण मुद्देमाल हस्तगत

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद साखर कारखान्यातून चोरीला गेलेल्या पितळी बुश चोरीप्रकरणी राहुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासां

खरीप पीकविमा भरण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
भाड्याच्या कारची स्वतःची म्हणून विक्री; शिक्षकाची साडेतीन लाखांची फसवणूक
जंतर मंतरवर तरुणांचे आंदोलन तीव्र; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉकरोच जनता पार्टी ठाम, सरकारच्या चर्चेच्या आवाहनाला नकार

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद साखर कारखान्यातून चोरीला गेलेल्या पितळी बुश चोरीप्रकरणी राहुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कारवाई करत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत गुन्ह्यातील तीन फरार आरोपींना श्रीरामपूर शहर परिसरातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर कारवाईची चाहूल लागताच चौथा आरोपी घरातून फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

वांबोरी येथील प्रसाद साखर कारखान्यातून ६ ऑगस्ट २०२६ रोजी पितळी बुश चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी फिर्यादी बबन सिताराम पागिरे (रा. वांबोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले होते. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांचे पथक ८ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर परिसरात रवाना झाले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सोएफ युनूस शहा (रा. वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर), कैसर निसार शेख (रा. वॉर्ड क्रमांक १, श्रीरामपूर) आणि मुत्तबिर युसुफ शहा (रा. वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) अशी आहेत.

या आरोपींकडून प्रसाद साखर कारखान्यातून चोरीस गेलेला पितळी बुश संपूर्णपणे हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईदरम्यान एका आरोपीला पोलिसांचा सुगावा लागल्याने तो घरातून पळून गेला. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय राठोड, पोलीस शिपाई सतीश कुऱ्हाडे, प्रमोद ढाकणे आणि नदीम शेख यांनी पार पाडली. तसेच श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे हवालदार मनोज गोसावी, कॉन्स्टेबल बडे, वाघमारे आणि माने यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करत आहे.

COMMENTS