Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैभव, संस्कार आणि आदर्शांचे अधिष्ठान असलेली विद्यानगरी म्हणजे अयोध्या- वे.शा.सं. प्रणव शास्त्री धानोरकर

नांदेड : अयोध्या ही केवळ एक ऐतिहासिक नगरी नव्हे, तर मानवतेच्या उत्कर्षाचे तेजस्वी प्रतीक मानली जाते. त्या काळात जगातील इतर संस्कृती विकासाच्या प्

मौत का खड्डा : 4 चिमुकल्यांचा बळी, जबाबदार कोण?महापालिकेतील अधिकारी की ठेकेदार? आता माफी नको, थेट कारवाई हवी!
नांदेडमधील हॉटेलांची अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी करा; नागरिकांकडून वाढती मागणी
शाळांच्या व्यापारीकरणाला लगाम; सक्तीच्या खरेदीवर शिक्षण विभागाचा कडक इशारा; गणवेश, पुस्तके, साहित्य विशिष्ट दुकानातून घेण्यास भाग पाडल्यास कारवाई अटळ

नांदेड : अयोध्या ही केवळ एक ऐतिहासिक नगरी नव्हे, तर मानवतेच्या उत्कर्षाचे तेजस्वी प्रतीक मानली जाते. त्या काळात जगातील इतर संस्कृती विकासाच्या प्रारंभीच्या टप्प्यावर असताना अयोध्येने भौतिक समृद्धीबरोबरच सामाजिक सुसंवाद आणि आध्यात्मिक उन्नतीचा उच्चांक गाठला होता. येथे वैभव आणि संपन्नता विपुल असली, तरी तिची खरी ओळख होती ती संस्कार, सद्गुण आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीमुळे. प्रत्येक व्यक्तीच्या आचरणात धर्म, संयम आणि कर्तव्यभाव प्रकट होत असल्याने अयोध्या ही एक आदर्श विद्यानगरी म्हणून उदयास आली होती, असे प्रतिपादन प्रख्यात प्रवचनकार वे.शा.सं. प्रणव शास्त्री धानोरकर गुरुजी यांनी केले.
विवेकनगर येथील मारुती मंदिर ट्रस्ट व भाविक भक्तांच्या वतीने आयोजित श्रीराम कथेमध्ये ते बोलत होते. या प्रसंगी परिसर जय श्रीरामच्या मंगल घोषांनी भारावून गेला होता. महाराजांनी आपल्या प्रगल्भ विवेचनातून रघुवंशाच्या गौरवशाली परंपरेचा मागोवा घेतला. राजा इक्ष्वाकू यांची न्यायनिष्ठा आणि धर्मपालन, राजा कुक्षी यांची ऋषीसेवा व दुष्काळमुक्त राज्याची कामना, तसेच राजर्षी पृथू यांचे कृषीसमृद्धीवर आधारित आदर्श शासन-या सर्व उदाहरणांतून त्या वंशाची उंची अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले. मांधाता राजाची करुणा, सगर वंशातील परंपरा आणि भगीरथाच्या अखंड तपश्चर्येतून गंगेचे पृथ्वीवर अवतरण हे या वंशाच्या दिव्य कार्याची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. राजा दिलीप यांची गोसेवा आणि राजा रघू यांची उदारता, पराक्रम व प्रजावत्सल वृत्ती ही रघुवंशाची वैशिष्ट्ये सांगताना महाराजांनी स्पष्ट केले की, या सर्व गुणांचा परिपूर्ण समन्वय प्रभू श्रीरामचंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतो. श्रीराम हे केवळ एक पराक्रमी राजा नव्हते, तर सत्य, धर्म, कर्तव्यनिष्ठा आणि करुणा यांचे सजीव मूर्तिमंत रूप होते. प्रवचनातून त्यांनी अयोध्येच्या वैभवाचे वर्णन करतानाच आजच्या समाजाने मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांच्या ओजस्वी वाणीने श्रोत्यांच्या अंतःकरणात रामभक्तीची जागृती निर्माण केली. कार्यक्रमास भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

COMMENTS