Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या संदेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच हरताळ?नायगावच्या आमदारांच्या वाढदिवसासाठी नांदेड शहर बॅनरबाजीत झाकले; खर्च, इंधन आणि दिखाव्यावर सवाल

नांदेड: देश आर्थिक आव्हानांच्या टप्प्यातून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना काटकसर करण्याचा, अनावश्यक खर

मुंबईत महायुतीचा विजय अटळ ः मुख्यमंत्री फडणवीस
महापालिकेत भाजपचे ‘कमळ’ फुलले
ऐतिहासिक स्वप्नांची राख रांगोळी!


नांदेड: देश आर्थिक आव्हानांच्या टप्प्यातून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना काटकसर करण्याचा, अनावश्यक खर्च टाळण्याचा तसेच संसाधनांचा संयमाने वापर करण्याचा संदेश दिला होता. मात्र त्याच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी हा संदेश कितपत गांभीर्याने घेतला आहे, याबाबत आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण नायगाव मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात उभारण्यात आलेल्या भव्य बॅनर्स आणि होर्डिंग्जमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे आमदार राजेश पवार हे नायगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तरीदेखील नांदेड शहरातील प्रमुख चौक, रस्ते, उड्डाणपूल परिसर, व्यापारी भाग आणि सिग्नल पॉईंट येथे मोठ्या प्रमाणावर त्यांचे वाढदिवसाचे बॅनर्स झळकत आहेत. हे बॅनर्स नायगाव, उमरी आणि मांजरम भागातील कार्यकर्त्यांनी लावल्याचे सांगितले जात असले तरी त्यासाठी झालेला खर्च आणि वापरण्यात आलेली यंत्रणा यावर आता नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. एका बाजूला सामान्य नागरिकांना इंधन बचतीचे धडे दिले जात आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर, महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरता यामुळे सर्वसामान्य माणूस आधीच त्रस्त आहे. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या प्रसिद्धीसाठी शेकडो किलोमीटर प्रवास करून मोठमोठे फ्लेक्स आणि बॅनर्स उभारणे, वाहनांचा ताफा वापरणे आणि शहरभर जाहिरातबाजी करणे ही नेमकी कोणती काटकसर आहे, असा संतप्त सवाल अनेक नागरिक उपस्थित करत आहेत.
राजकीय वर्तुळातही या प्रकाराची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. भाजप हा शिस्तबद्ध आणि विचारांवर चालणारा पक्ष असल्याचा दावा सातत्याने केला जातो. मात्र पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने दिलेला संदेश स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांकडूनच धाब्यावर बसवला जात असेल, तर सामान्य कार्यकर्त्यांनी कोणता आदर्श घ्यायचा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शहरात लावण्यात आलेल्या अनेक बॅनर्समुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे. रस्त्यांच्या मधोमध, चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या या जाहिरातींमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची भावना पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एका बाजूला प्रशासन अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबवत असताना दुसर्‍या बाजूला राजकीय बॅनरबाजीवर मात्र कारवाई होत नसल्याचा आरोपही केला जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी टाळा, खर्च कमी करा, संसाधनांचा जपून वापर करा, असे आवाहन केले असताना त्याच पक्षातील काही नेत्यांचे कार्यकर्ते मात्र वाढदिवसाच्या नावाखाली शक्तिप्रदर्शन आणि दिखाऊ प्रसिद्धीमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मोदींचा संदेश फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का? असा उपरोधिक प्रश्‍न आता नांदेडकर विचारू लागले आहेत.

COMMENTS